For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर कारवाई करा

10:16 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर कारवाई करा
Advertisement

शिरोली अभयारण्यातील झाडांची तोड : वनमंत्र्यांकडे तक्रार करणार : खानापुरात ब्लॉक काँग्रेसची पत्रकार परिषद

Advertisement

खानापूर : तालुक्यातील शिरोली येथील अभयारण्यातील आणि स्वत:च्या मालकीच्या जमिनीतील सिसम आणि सागवान यासह इतर जातीची झाडांची कत्तल करून परस्पर विल्हेवाट लावून आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता केला आहे. मात्र खानापूर विभागीय वनाधिकारी सुनिता निंबरगी आणि लोंढा वनाधिकारी तेज वाय. पी. यांनी झाडे तोडणाऱ्या शेतीमालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.  एका पोलीस अधिकाऱ्याचा दबाव असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही, हेही स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच या विरोधात वनमंत्री ईश्वर खांड्रे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचे ब्लॉक काँग्रेसच्यावतीने विश्रामधामात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅङ आय. आर. घाडी, शहराध्यक्ष महांतेश राऊत, केपीसीसी सदस्य महादेव कोळी, ज्येष्ठ नेते चंबाण्णा होसमणी, सुरेश जाधव, लायकअली बिच्चन्नावर, लक्ष्मण मादार, गुडू टेकडी, सूर्यकांत कुलकर्णी, तोईद चांदकन्नावर यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

माहिती देताना ब्लॉक अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, शिरोली येथे सर्वेनंबर 97 या शेताला जाण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या सरकारी जागेतील सिसम आणि सागवानी यासह इतर जंगली झाडांची कत्तल विनापरवाना करण्यात आली आहे. हे सर्व होत असताना लोंढा विभागाचे वनाधिकारी उघड्या डोळ्यानी पहात गप्प राहिले होते. शिरोली हे गाव भीमगड अभयारण्य क्षेत्रात येते. या ठिकाणी झाडे तोडण्यास सक्त मनाई आहे. भीमगड अभयारण्य आणि इकोसेन्सेटीव्ह झोनचे निमित्त करून या भागातील विकास गेल्या पंधरा वर्षापासून अडवला गेला आहे. या भागातील गवाळी, पास्टोली, मेंडील, कृष्णापूर, गवळीवाडा, कोंगळा, देगाव, मांगिनहाळ या गावांचा रस्ता, वीज, पाणीपुरवठा योजना वनखात्याकडून अडवल्या गेल्या आहेत. सामान्य शेतकऱ्यांना शेती करणेही अवघड झालेले आहे. असे असताना शिरोली येथील सर्व्हे नं. 97 मधील झाडे आणि सरकारी जमिनीतील झाडे विनापरवाना तोडून शेतासाठी रस्ता करण्यात आला. मात्र वनखात्याने कारवाई केली नव्हती. यामागचे गूढ काय हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

शहर ब्लॉक अध्यक्ष महांतेश राऊत म्हणाले, शिरोली सर्व्हे नं. 97 ही जमीन एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या नातलगाच्या नावे खरेदी केली असून आपल्या शेताला जाण्यासाठी रस्ता नसल्याने वनखात्याच्या जमिनीतील झाडे आणि आपल्या शेतातील झाडांची बेमुसार कत्तल केली आहे. मात्र लोंढा आणि खानापूर वनाधिकाऱ्यांनी या विरोधात काहीच कारवाई केलेली नाही. वनखात्याने सामान्य नागरिकांना जंगलात जाणेही बंद केले आहे. आणि नाहक त्रास देवून नागरिकांना वेठीला धरण्यात येत आहे. जर या अधिकाऱ्यावर कारवाई केली नसल्यास वनाधिकाऱ्यांविरोधात उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल.

सुरेश जाधव म्हणाले, तालुक्यातील दुर्गम भागाचा विकास वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे अडलेला आहे. माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात या दुर्गम भागातील गावांना रस्ता आणि पूल मंजूर झाले होते. मात्र वनखात्याच्या जाचक अटीमुळे निधी वापस गेलेला आहे. जंगलातील तसेच दुर्गम भागातील नागरिकांना सुविधा पोहचविणे हे सरकारचे काम असताना तसेच सुविधा पुरविण्यासाठी कायद्यात तरतूद असताना तालुक्यातील वनखाते अभयारण्य आणि इकोसेन्सेटीव्ह झोनचे पालूपद पुढे करून विकासात खिळ घालत आहे. आणि या दुर्गम भागातील लोकांना स्थलांतरासाठी दबाव आणत आहेत. दुर्गम भागातील सामान्य जनतेला वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे शेती करणेही अवघड झाले आहे. असे असताना शिरोलीसारख्या भागात खुलेआम संरक्षीत आणि अभयारण्यातील झाडांची कत्तल होत असताना अधिकारी मूग गिळून गप्प का होते. यामागचे गूढ काय? तरी या झाडे कत्तल करणाऱ्यांवर वनखात्याने कठोर कारवाई करावी, तसेच लेंढा वनाधिकारी तेज वाय. पी. आणि खानापूर विभागीय वनाधिकारी सुनिता निंबरगी यांच्याविरोधात वनमंत्री ईश्वर खांड्रे याच्याकडे लेखी तक्रार करणार असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

Advertisement
Tags :

.