निकृष्ट रस्त्यांबाबत कंत्राटदारांसह अभियंत्यावरही कारवाई करा!
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची मागणी
फोंडा : राज्यातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे वीजमंत्री सुदिन उर्फ रामकृष्ण ढवळीकर यांनी म्हटले आहे. बांधकाम खात्यातील कनिष्ठ, साहाय्यक, मुख्य अभियंत्यांवरही ढवळीकर यांनी शरसंधान साधले आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकताना बांधकाम खात्यातील अभियंत्यानाही तेवढेच जबाबदार धरून त्dयांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ढवळी-फोंडा येथील गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सीपीडब्ल्यूडीच्या अंतर्गत सरकारी अभियंते कंत्राटदाराबरोबर एक करार करतात. त्या कराराची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचे काम अभियंत्यांचे आहे. नियमांचे उल्लंघन केलेल्या अभियंत्यावर कारवाई होणे तेवढेच गरजेचे आहे. माजी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या कार्यकाळात वारेमाप पद्धतीने रस्तेबांधणी करण्यात आली. ते आमचे दुर्भाग्य होते. यावेळी सीपीडब्लूडीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोपही ढवळीकर यांनी केला. आज त्याच निकृष्ट कामाची फळे सरकाराला भोगावी लागत असल्याचे ते म्हणाले.
नोकर भरतीत भ्रष्टाचार पुराव्यासह सिद्ध करा
आपल्या मडकई मतदारसंघात सर्व रस्ते गुळगुळीत असून त्याला केवळ एक रस्ता अपवाद आहे. त्याही रस्त्याचे काम येत्या 15 ऑक्टोबरनंतर हाती घेण्यात येणार आहे. ढवळी ते फोंडा पोस्ट ऑफिसपर्यत जसे रस्ते निर्माण केले आहेत त्याप्रमाणे राज्यातील सर्व रस्ते सुधारणे गरजेचे आहे. महसूल खात्यात नोकरभरतीत भ्रष्टाचार झाला याबद्दल निरर्थक टीका कुणी करू नये. महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे उत्तम कार्य आहे, विजय सरदेसाई हे आपले चांगले मित्र आहेत. केवळ हवेत गोळ्या झाडून निरर्थक टीका करण्यापेक्षा पुराव्यासह आरोप सिद्ध करून दाखवा, असे आव्हान त्यांनी टीकाकारांना दिले आहे.