अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा
दि ऑटो रिक्षा ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशनची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गांजा तसेच इतर अंमली पदार्थांचे सेवन करून रिक्षा चालकांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे केवळ रिक्षाचालकच नाही तर नागरिकांनाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे गांजा तसेच इतर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तसेच खरेदी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दि ऑटो रिक्षा ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दोन दिवसांपूर्वी शहरात एका रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला झाला. रात्रीच्यावेळी एका प्रवाशानेच हल्ला केला होता. यामध्ये तो रिक्षाचालक सुदैवाने बचावला. परंतु यामुळे शहरातील अंमली पदार्थ विक्रीचा मुद्दा पुन्हा एका ऐरणीवर आला. गांजा, ड्रग्स, अफीम यासह इतर अमली पदार्थांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. ही त्वरित थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष मन्सूर होनगेकर, उपाध्यक्ष गौतम कांबळे, जनरल सेक्रेटरी अब्दुल मेस्त्री, दुबईवाले, रफीक देवलापूर, अनिम मुल्ला, उम्मीद संकीहळ्ळी, अब्दुलखादर शेख, मलिक मुल्ला, मुन्ना हवालदार, संगाप्पा जी., मोनुद्दीन मुकाशी यासह इतर सदस्य उपस्थित होते.