भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा
कोल्हापूर नेक्स्टची मागणी
कोल्हापूर
‘गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत महानगरपालिका प्रशासन अजगरासारखे सुस्त पडले आहे. नागरी सुविधा सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करून आणि आंदोलने करून सुद्धा नागरिकांच्या समस्यांवर उपाय न करणाऱ्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा.‘अशी मागणी चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे-पाटील आणि रश्मी साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली.
गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार कुंभकर्णी पद्धतीचा आणि प्रशासन अजगराप्रमाणे सुस्त झाले आहे. अनेक नागरिक सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर नेक्स्टने आंदोलन केल्यानंतर महापालिकेत विविध विभागांर्तगत बैठका घेतल्या. पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभाग आणि आरोग्य विभाग वगळता इस्टेट, परवाना आणि नगररचना विभागाने दिलेल्या निवेदनांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. नगररचना विभागाला 26 सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्राचे उत्तर दिलेले नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यात नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढच होत चाललेली दिसून येत आहे. इस्टेट विभाग आणि परवाना विभाग यांच्या अक्षम्य दुलर्क्षामुळे कोल्हापुरात रस्त्यावरील, महानगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे वाढलेली आहेत आणि बेकायदेशीर यात्री निवासांचे कोल्हापुरात अक्षरश: पेव फुटले आहे. परवाना विभागाची उदासीनता आहे. नगररचना विभागातील अनागोंदी वर प्रशासकांनीही काही वेळा कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु येथील अधिकारी त्यांनाही जुमानत नाहीत. या सर्व बाबींची प्रशासकांनी गांभीर्याने दखल घ्यावी. यावेळी स्वाती कदम, डॉ.अश्विनी माळकर, डॉ.प्रीतम शहा, सुरज धनवडे, परितोष उरकुडे, अशोक लोहार, जयंत गोयानी, योगेश आठवले, मालती शिंदे, अनिल पोवार, संतोष जोशी, प्रवीणचंद्र शिंदे, रणजीत पाटील, प्रसाद पाटोळे, गौरप सातपुते आदि सहभागी होते.