फातोर्डा स्टेडियम आवारातील बांधकामावर कारवाई करा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आदेश
मडगाव : फातोर्डा स्टेडियमच्या आवारात होत असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस व दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांना दिला. सरकारच्या कोणत्याच यंत्रणेची कोणतीही परवानगी न घेता फातोर्डा स्टेडियमच्या आवारात बेकायदा बांधकाम केले जात असून हे बांधकाम बंद ठेवावे, असा आदेश फातोर्डा स्टेडियमच्या व्यवस्थापकाने दिला असला तरी या ठिकाणी रात्रीच्यावेळी काम केले जात असून काल हा प्रकार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनास आणला असता, मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्याचा आदेश दिला. ज्या ठिकाणी हे बांधकाम केले जाते ती जागा गोवा क्रीडा प्राधिकरणाची आहे. हे बांधकाम करताना संरक्षक भिंतही तोडण्यात आली आहे. तसेच बांधकाम केले जात असलेल्या ठिकाणी काँक्रिट टाकण्यात आले आहे. आता छत उभारण्यासाठी लोखंडी खांबही उभे करण्यात आलेले आहेत.
रात्रीच्यावेळी काम कशासाठी
जर या बांधकामाला मान्यता असती तर हे काम दिवसा केले असते. हे काम रात्रीच्यावेळी केले जात असल्याने या बांधकामाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात फातोर्डा स्टेडियमचे व्यवस्थापक राजेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, या बांधकामाला आम्ही मान्यता दिलेली नाही. जेव्हा हा प्रकार लक्षात आला, तेव्हा हे काम बंद ठेवण्यास सांगितले होते तसेच त्या कामाचा तपशील क्रीडा संचालकांना पाठविण्यात आला होता. क्रीडा संचालकांनी देखील या संदर्भात ठोस पावले उचलली नव्हती.
स्टेडियम व्यवस्थापक गोत्यात
स्टेडियम व्यवस्थापक राजेश नाईक यांना या बेकायदेशीर बांधकामांची पूर्ण कल्पना असून त्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने न पाहिल्याने ते गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता स्टेडियम व्यवस्थापक रजेवर गेलेले आहेत. स्टेडियमच्या आवारात हे बेकायदा बांधकाम होत असून ते जाणूनबुजून रजेवर गेले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असून हा बेकायदा प्रकार बंद करण्याचा आदेश दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.