Takari Bridge Height: कृष्णेवरील ताकारी पुलाची उंची वाढवण्याची गरज का आहे?
वाहतूकीची वर्दळ पाहता या पुलाचे रुंदीकरणाबरोबरच उंची वाढवण्याची गरज
By : सागर वाझे
बोरगाव : राजारामबापू सेतूने (ताकारी पूल) आजवर अनेक पूर, महापूराचे धक्के सोसत वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत. या पन्नास वर्षात हा पूल अनेक गार्वाच्या वाहतुकीचा आधार ठरला आहे. या रस्त्यावरील वाहतूकीची वर्दळ पाहता या पुलाचे रुंदीकरणाबरोबरच उंची वाढवण्याची गरज आहे.
तालुक्यातील नदीपलीकडच्या गावांचा संपर्क होऊन कडेगाव, पलूस, तासगाव या तालुक्याच्या संपर्कासाठी ताकारी येथील कृष्णा नदीवर पुलाची गरज ओळखून तत्कालीन मंत्री राजारामबापू पाटील यांनी ३१ जानेवारी १९६९ रोजी पुलाचे भूमिपूजन केले.
अवघ्या एका वर्षात पूल पूर्ण होऊन वाहतुकीस खुला झाला. यामुळे वाळवा तालुक्यातील नदीपलीकडील गावांचा संपर्क अन्य तालुक्यांशी गतिमान डोण्यास फायद्या झाला. तालुक्याच्या ठिकाणी झालेली साखर कारखान्याची निर्मिती आणि या साखर कारखानदारीसाठी कारखाना कार्यक्षेत्रात येणाऱ्या नदीपलीकडच्या गावांचा ऊस वाहतुकीसाठी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.
नव्याने निर्मित झालेल्या पलूस, कडेगाव, तासगाव या तालुक्यातील चाळीसहून अधिक गावांचा संपर्क वाळवा तालुक्याशी अधिक गतिमान डोण्यास हा पूल उपयुक्त ठरला. रस्ते विकासामुळेच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधता येतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन मंत्री लोकनेते राजारामबापू पाटील यांनी या पुलाची उभारणी मोठ्या पुढाकाराने केली.
आज या पूलाला ५० हून अधिक वर्षे झाली. अनेकवेळा या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने डागडूजी केली. सदर पुलाची स्ट्रक्चरल ऑडिट होऊन या पुलाच्या जागी नव्याने उंची वाढवून व चौपदरी वाहतुकीस योग्य ठरावा अशा प्रकारचा नविन पूल व्हावा, अशी लोकांची मागणी आहे.
आमदार जयंत पाटील यांच्या ४० वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. अनेक ठिकाणी नव्याने पूलांची निर्मिती झाली आहे. परंतु या ५० वर्ष पूर्ण झालेल्या पूलाच्या बाबतीत आता नव्याने उभारणीची गरज आहे.
ताकारी लगत असणारे रेल्वे स्थानक, किर्लोस्करवाडी सारखा मोठा उद्योग यामुळे या परिसरात ऊस शेती बरोबरच छोटे-मोठे उद्योगांचे जाळे निर्माण झाले आहे. या पूलावरून होणारी वाहतूक दिवसागणिक वाढत चालली आहे.
त्यातच जुन्या तंत्रज्ञानाच्या आधारे उभारलेला पूल सध्याच्या रस्ते विकासात उंचीला कमी ठरू लागला आहे.
पूर परिस्थिती निर्माण झाल्यास, पूल पाण्याखाली नाही गेला तरी पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करावी लागते. पूर परिस्थितीतही पूल वाहतुकीस खुला राहावा, अशा पद्धतीची रचना करून नव्याने फुलाची उभारणी केली तर महापुराच्या काळात हा रस्ता वाहतुकीस कायमचा खुला राहील.
राजारामबापू सेतूने सोसले धक्के
सन १९७६, १९९४, २००५, २००६, २०१९, २०२१ या काळात कृष्णा नदीला आलेला पूर वा महापूर याकाळात हा पूल या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आजही उभा आहे. या बसलेल्या धक्क्यातून त्याची झालेली हानी आणि पन्नास वर्षाचा विचार करता या पुलाच्या जागी नव्याने पूल होऊन या राजारामबापू सेतूचा उद्धार व्हावा, अशी अपेक्षा आता परिसरातील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.