चाबहार संबंधी तजाकिस्तानने उचलले पाऊल
पाकिस्तानची आयएसआयला बसणार झटका : भारताला होणार लाभ
► वृत्तसंस्था/ तेहरान
तालिबान अन् टीटीपी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना सामोरा जात असलेल्या पाकिस्तानला आणखी एक झटका बसला आहे. तजाकिस्तानने इराणसोबत चाबहार बंदराच्या वापरावरून चर्चा सुरू केली आहे. तजाकिस्तान आणि इराण यांच्यादरम्यान भारताकडून विकसित चाबहार बंदरावरून मालवाहतूक करण्यासंबंधी चर्चा होत आहे. तजाकिस्तान आणि इराण यांच्यात करार झाल्यास भारताला तो लाभदायक ठरणार आहे. एकीकडे यामुळे भारतासाठी मध्य आशियापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल, तर दुसरीकडे चाबहार बंदरातून कमाईही होणार आहे. भारताने चाबहार बंदर विकसित करण्यासाठी कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक केली असून 2024 मध्ये या बंदराच्या व्यवस्थापनावरून 10 वर्षांचा करारही केला आहे.
तजाकिस्तानचा इराणसोबत करार झाल्यास पाकिस्तानला मोठा झटका बसणार आहे. पाकिस्तानकडून तजाकिस्तानला तालिबानच्या विरोधात चिथावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलिकडेच पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी तजाकिस्तानचा दौरा केला होता. आयएसआय प्रमुखाने तजाकिस्तानच्या अध्यक्षांसोबत तालिबानविरोधी नॉर्दर्न अलायन्सच्या नेत्यांशीही चर्चा केली होती. अहमद मसूद समवेत नॉर्दर्न अलायन्सच्या नेत्यांनी एनआरएफ नावाची संघटना स्थापन केली असून ती तजाकिस्तानातून तालिबानच्या प्रशासनाला सशस्त्र स्वरुपात आव्हान देत आहे.
तालिबान-तजाकिस्तान संबंधांमध्ये सुधार
भारत आणि आखाती तसेच हिंदी महासागराच्या देशांसोबतचा व्यापार वाढावा अशी इच्छा तजाकिस्तानची आहे. याचमुळे चाबहार बंदराद्वारे मालवाहतुकीचा करार करण्याचा प्रयत्न तजाकिस्तानकडून केला जात आहे. तजाकिस्तानचे वाहतूक मंत्री अजीम इब्राहिम आणि इराणचे रस्ते परिवहन मंत्री फरजानेह सदेघी यांनी अलिकडेच एका सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. याच्या माध्यमातून चाबहार बंदराद्वारे सामग्रीची वाहतूक केली जाणार आहे. यापूर्वी तजाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी इराणचे बंदर अब्बासच्या वापराचीही घोषणा केली होती.
अन्य देशांमधून जाणार मार्ग
तजाकिस्तानची सीमा इराणला लागून नाही. तजाकिस्तानला इराणच्या बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी उझ्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या मार्गांचा वापर करावा लागणार आहे. तजाकिस्तानमधून चाबहार बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानचा मार्ग सर्वात कमी अंतराचा आहे.
ताजिक वंशीयांचे प्रमाण अधिक
मध्य आशियाच्या देशांच्या तुलनेत तजाकिस्ताने अद्याप तालिबान सरकारसोबत संबंध मधूर ठेवलेले नाहीत. परंतु दोघांदरम्यान आता संबंध दृढ होत आहेत. अफगाण समाजात तजाकिस्तानची भूमिका अत्यंत अधिक आहे. अफगाणिस्तानात मोठ्या संख्येत ताजिक वंशाचे लोक राहतात. तजाकिस्तानला तालिबानला रोखण्यास तयार आहे, परंतु पाकिस्तानच्या आग्रहानुसार तालिबान सरकारच्या विरोधात कुठलीही सुरक्षा आघाडी स्थापन करण्यास तयार नाही. भारत आणि तजाकिस्तान यांच्यात दशकांपेक्षा जुनी मैत्री आहे आणि आता तालिबान सरकार तसेच भारतादरम्यान देखील मैत्रीचे संबंध निर्माण होत असल्याचे मानले जात आहे.