For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ताज हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा; शिरोडा-वेळागर त्रिपक्षीय कराराचे वेंगुर्ल्यात रजिस्ट्रेशन पूर्ण

ताज हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा  शिरोडा वेळागर त्रिपक्षीय कराराचे वेंगुर्ल्यात रजिस्ट्रेशन पूर्ण
Advertisement

वेंगुर्ले (भरत सातोस्कर) : शिरोडा-वेळागर येथील बहुचर्चित ताज हॉटेल प्रकल्पाच्या त्रिपक्षीय कराराचे रजिस्ट्रेशन गुरुवारी (3 सप्टेंबर) वेंगुर्ले येथील रजिस्ट्रार कार्यालयात पूर्ण झाले. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेल प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

Advertisement

या प्रकल्पासंदर्भातील त्रिपक्षीय करारावर 18 ऑगस्ट रोजी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी या कराराची कायदेशीर नोंदणी पूर्ण करण्यात आली.

वेंगुर्ले रजिस्ट्रार कार्यालयात झालेल्या या प्रक्रियेस सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी प्रमुख उपस्थित होते. यावेळी एमटीडीसीचे जिल्हास्तरीय अधिकारी दीपक माने, इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे अधिकारी सँवीओ डीमेलो व सिंथीयाल नरोना, तसेच शिरोडा-वेळागर जमीन मालक सहकारी संस्थेचे अध्यक्ष शरद कांबळी, सचिव मंगेश डोंगरे, संचालक जगन्नाथ डोंगरे, लक्ष्मीकांत ऊर्फ विनू नाईक, संतान पावलू सोझ आणि सल्लागार तज्ज्ञ संचालक जनार्दन पडवळ उपस्थित होते.

Advertisement

दीपक केसरकर, नितेश राणे, नारायण राणेंचे सहकार्य

शिरोडा-वेळागर जमीन मालक सहकारी संस्थेचे सचिव मंगेश डोंगरे यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या संपूर्ण प्रवासात आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री तथा मत्स्य, उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे, तसेच खासदार नारायण राणे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे प्रकल्पाच्या प्रक्रियेत आलेल्या विविध अडचणींवर मात करता आली, असा दावा त्यांनी केला.

ताज हॉटेलसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प सिंधुदुर्गात येत असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही डोंगरे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच विविध जोडधंद्यांनाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील युवकांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा आणि प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही आभार

प्रकल्पाच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी आणि भूसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पवार यांचेही संस्थेच्या वतीने डोंगरे यांनी आभार मानले.

त्रिपक्षीय कराराचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याने शिरोडा-वेळागर येथील ताज हॉटेल प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.