चिनी हस्तकांच्या विरोधात तैवानचे अभियान
गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी पत्रकाराला अटक
वृत्तसंस्था/ तैपेई
चीनसोबतच्या तणावादरम्यान तैवानच्या सरकारने देशात चीनच्या हस्तकांविरोधात अभियान हाती घेतले आहे. याच अंतर्गत तैवानमध्ये एका पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या पत्रकाराने सैन्याच्या अधिकाऱ्यांना चीनसाठी हेरगिरी करण्यासाठी प्रलोभने दाखवत लाच दिल्याचा आरोप आहे. तैवानमधील न्यायालयाने एक टीव्ही पत्रकार आणि 5 सैन्याधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे. या पत्रकाराचे नाव उघड करण्यात आले नाही. परंतु सीटीआय टीव्हीने स्वत:चा पत्रकार लिन चेन-यू याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देणारे वक्तव्य जारी केले आहे.
या प्रकरणाची आम्हाला विस्तृत माहिती नाही, परंतु आम्ही निष्पक्ष न्यायालनीय प्रक्रियेची मागणी केल्याचे सीटीआय टीव्हीने म्हटले आहे. तैवान सरकार देश आणि सैन्यामधील हेरगिरीच्या प्रकरणांची नियमित चौकशी करते, परंतु पत्रकारांच्या विरोधात अशाप्रकारचे आरोप होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
चीन तैवानला स्वत:चा भूभाग ठरवत वेळप्रसंगी बळाच्या जोरावर त्यावर कब्जा करण्याची धमकी देत असतो. चीनकडून सध्या तैवानवरील सैन्य दबाव वाढविला जात आहे. मागील महिन्यात अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची विक्रीची करण्याची घोषणा केली होती. यानंतर चीनच्या सैन्याने दोन दिवसांपर्यंत तैवानच्या सीमेनजीक व्यापक सैन्याभ्यास केला होता.
तैवानी पत्रकारावरील आरोप
पत्रकार लिन याच्यावर सैन्याधिकाऱ्यांना चिनी हस्तकांना गोपनीय माहिती पुरविण्याच्या बदल्यात अनेक हजार तैवानी डॉलर्स देण्याचा आरोप आहे. तैवानच्या तपास यंत्रणेने हे चिनी हस्तक कोण होते आणि ते चीनच्या सरकारशी संबंधित होते की नाही हे स्पष्ट केले नाही. तैवानच्या तपास यंत्रणांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि भ्रष्टाचार कायद्यांचे उल्लंघन आणि गोपनीय माहितीच्या खुलाशाच्या चौकशीच्या अंतर्गत पत्रकार आणि 9 सैन्याधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. लिन हा राजकीय पत्रकार आणि अँकर होता.