संरक्षणासाठी तैवानकडून अतिरिक्त 40 अब्ज डॉलर्स
मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करण्यात येणार
तैपेई :
चीनच्या हल्ल्याच्या धोक्याला सामोरे जाणाऱ्या तैवानचे अध्यक्ष लाई चिंग ते यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे. तैवान 40 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त निधी संरक्षणावर खर्च करणार आहे. आक्रमकतेच्या विरोधात तडजोडीचा प्रयत्न केला तर केवळ ‘गुलामी’ पदरात पडते, हे इतिहासाने सिद्ध केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोडीला कोणतेच स्थान नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वातंत्र्य तसेच लोकशाहीची मुख्य मूल्यं आमच्या देशाचा पाया आहेत असे अध्यक्ष लाई यांनी म्हटले. चीनने अत्यंत मोठ्या प्रमाणात युद्धाची तयारी केली असताना तैवानने ही घोषणा केली आहे. स्वत:चे रक्षण करण्यासाठी तैवान प्रतिबद्ध आहे. तैवानवर चीनचा कब्जा होण्यापासून रोखण्यादरम्यानचा संघर्ष आहे. हा केवळ एक वैचारिक संघर्ष किंवा एकीकरण विरुद्ध स्वातंत्र्याचा वाद नसल्याचे लाई यांनी स्पष्ट केले आहे.
विध्वंसाकडे वाटचाल : चीन
तैपेई बाहेरील शक्तींना त्याचे निर्णय ठरविण्याची अनुमती देत आहे. या निधीचा वापर लोकांचे राहणीमान सुधारणे आणि अर्थव्यवस्थेला विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु ते याचा वापर शस्त्रखरेदीसाठी करत आहेत. हा प्रकार तैवानला विध्वंसाकडे नेणारा ठरू शकतो. तैवानवर संरक्षणावर अधिक खर्च करण्यासाठी अमेरिका दबाव टाकत असल्याचा आरोप चीनच्या विदेश मंत्रालयाने केला.