तैवानने मागितली भारताची माफी
मंत्र्याकडून भारतीयांसंबंधी वर्णद्वेषी टिप्पणी
वृत्तसंस्था/ तैपेई
तैवानने भारतीयांना उद्देशून करण्यात आलेली वर्णद्वेषी टिप्पणीसाठी माफी मागितली आहे. तैवानच्या कामगारमंत्र शू मिंग चूं यांनी 4 मार्च रोजी भारतासोबत झालेल्या करारावर चर्चा करताना तैवान भारताच्या ईशान्येतील ख्रिश्चन कामगारांना प्राधान्य देईल, कारण त्यांचे रुप-रंग आणि आहार तैवानी लोकांसारखाच असल्याचे म्हटले होते. भारताने मंत्र्याच्या या टिप्पणीला वर्णद्वेषी ठरवत आक्षेप नोंदविला होता.
मंत्र्याची टिप्पणी खेदजनक आहे. तैवान कुठल्याही स्थलांतरित कामगार किंवा व्यावसायिकासोबत त्याचे रुप-रंग, जात-धर्म, भाषा आणि आहार सवयींवरून भेदभाव करत नाही. तैवानमध्ये सर्व भारतीयांसोबत योग्य वर्तन केले जाईल असा विश्वास भारत सरकारला देत असल्याचे तैवानकडून म्हटले गेले आहे.
कामगारमंत्री शू मिंग चूं यांना भारतासोबत झालेल्या कामगारविषयक करारासंबंधी मत विचारण्यात आले होते. तसेच भारत-तैवान यांच्यातील सांस्कृतिक फरकावर याचा कोणता प्रभाव पडणार अशी विचारणा तेथील मंत्र्यांना करण्यात आली होती. ईशान्य भारतातील लोकांचा रंग, आहाराची पद्धत आमच्याशी मिळतीजुळती आहे. ते आमच्याप्रमाणेच ख्रिश्चन धर्मावर अधिक विश्वास ठेवतात. ते कामात देखील निपुण आहेत. याचमुळे प्रथम ईशान्य भारतातील कामगारांची भरती केली जाणार असल्याचे चूं यांनी उत्तरादाखल सांगितले होते.
17 फेब्रुवारीला करार
भारत आणि तैवानने 17 फेब्रुवारी रोजी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या करारानुसार भारतीय कामगारांसाठी तैवानचे दरवाजे खुले होणार आहेत. तैवान सध्या उत्पादन, बांधकाम आणि कृषी क्षेत्रात कामगारांच्या कमतरतेला सामोरा जात आहे. या कराराच्या अंतर्गत भारतातून किती स्थलांतरित कामगारांना प्रवेश द्यावा याचा निर्णय तैवानच घेणार आहे.