‘टेलरस्मार्ट’ : भारतीय शिवणाची जागतिक झेप!
ग्राहकांना त्यांचे शरीर व व्यक्तिमत्त्व यानुरुप साजेसे कपडे शिवून देण्याच्या व्यावसायिक उद्दिष्टाने ‘टेलरस्मार्ट’ या शिलाई स्टार्टअपची स्थापना करण्यात आली असून दशकभराच्या कालावधीत या नाविन्यपूर्ण स्टार्टअपने चांगले नाव व व्यवसाय कमावले आहे.
‘टेलरस्मार्ट’ ची सुरुवात 2014 मध्ये प्रविण झाडे व जॉय डिसिल्वा या युवा उद्योजकांनी केली. त्यांच्या व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद मिळू लागला. नंतर व्यक्तिगत कारणांनी जॉय डिसिल्वाने ‘टेलरस्मार्ट’ सोडण्याचा निर्णय घेतल्याने या स्टार्टअपला नव्या उद्योजक सहकाऱ्याची गरज प्रकर्षाने भासली. त्यावेळी ‘टेलरस्मार्ट’ला समर्थ साथ मिळाली ती प्रीतम ओन्स्कर या तेवढ्याच हौशी व उत्साही उद्योजक सहकाऱ्याची. मुख्य म्हणजे प्रीतम ओन्स्कर हे ‘टेलरस्मार्ट’ चे जुने ग्राहक. त्यांना मिळणारी दर्जेदार सेवा व शिवण वैशिष्ट्या याने प्रभावित झालेल्या प्रीतमने ‘टेलरस्मार्ट’मध्ये सहर्ष भागीदारी स्विकारली. यातूनच ‘टेलरस्मार्ट’चा अधिक दमदार व्यावसायिक प्रवास सुरु झाला हे विशेष.
एका नव्या व वैशिष्ट्यापूर्ण स्टार्टअपसाठी काम करणाऱ्या प्रीतम ओन्स्कर यांच्या मते ‘टेलरस्मार्ट’चे काम एका साध्या व महत्त्वाच्या व्यावसायिक तत्वावर चालते. हे मुलभूत व्यवसाय तत्व म्हणजे प्रत्येक ग्राहकाला त्याच्या शरीरयष्टी व मापानुरुप कपडे त्याच्या वैयक्तिक गरजा प्रचलित शिवण विषयक प्रगत पद्धती यांचा मेळ घालून प्रत्येक ग्राहकासाठी विशेष स्वरुपाचे व नेमक्या प्रकारचे कपडे शिवणे. ही छोटी व महत्त्वाची बाब आमच्या व्यवसायात मोठी परिणामकारक ठरते याचा प्रीतम ओन्स्कर आवर्जुन उल्लेख करतात.
‘टेलरस्मार्ट’ चे संचालक प्रीतम ओन्स्कर यांच्या मते मूलत: तयार शिवलेले म्हणजेच रेडिमेड कपडे खरेदी करून त्यांचा प्राधान्याने वापर करणे ही बाब युरोपसह पाश्चात्य देशांमध्ये सर्वमान्य आहे. त्यांच्या मते भारतामध्ये मात्र तयार कपड्यांच्या संदर्भातील वापर आणि आवड सर्वस्वी वेगळी आहे. यातूनच भारताला जागतिक स्तरावर कपडे शिवण्याच्या व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी नेहमीच मोठी संधी असेल, हे लक्षात ठेवायला हवे.
या संदर्भातील उपलब्ध आकडेवारी व तपशिलानुसार भारतात सध्या असंघटित अशा व अनौपचारिक स्वरुपात काम करणाऱ्या कौशल्यप्राप्त अशा शिलाई कारागीरांची संख्या सुमारे 3 कोटींवर आहे. सध्या देशांतर्गत कपड्यांची शिलाई व संबंधित शिवणकाम याद्वारे होणाऱ्या व्यवसायातून दरवर्षी सुमारे 26000 कोटी रुपयांची उलाढाल होते. हा व्यवसाय वाढण्यासाठी मोठा वाव आहे, असे जाणकारांचे मत आहे.
जागतिक स्तरावर कपडे शिलाई व्यवसायाच्या संदर्भात भारताला आज प्रथम पसंती दिली जाते. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजही भारतात कपडे शिवण्यासाठी लागणारा खर्च जागतिक पातळीवर न्यूनतम असतो. परंपरागत व पिढीजात कारागिरी व कौशल्यपूर्ण शिलाई कामामुळे भारताने तयार कपडे उद्योगात आपले पहिले स्थान कायम राखले आहे. सरकारचे लघूउद्योगांसह अशा प्रकारच्या उद्योगांना सहकार्य करण्याचे धोरण पूरक ठरते. भारतात कपडे शिलाई उद्योगांसाठी आवश्यक असे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
सध्याच्या सार्वत्रिक स्पर्धेच्या युगात ‘टेलरस्मार्ट’चे प्रमुख वेगळेपण व वैशिष्ट्या सांगताना संचालक प्रीतम ओन्स्कर नमूद करतात की, ग्राहकांचे कपडे नेमके व त्यांना हव्या त्या पद्धतीने मात्र आमच्या कारागिरांचा अनुभव व कौशल्यांसह शिवण्यासाठी आम्ही त्यांचे नेमके मापच घेत नाही तर त्यांची आवड, अपेक्षा लक्षात घेतो. याशिवाय ग्राहकांना त्यांची आवड व बजेट यांची नेमकी सांगड घालून त्यांच्या कपड्यांची शिलाई करून देतो. यामुळे ग्राहकांच्या रंगसंगती पासून नेमके व त्यांच्या पसंतीचे कपडे तुलनेने व्यापक खर्चात मिळू शकतात. त्यांच्या मते त्यांची सर्वात मोठी जमेची व्यावसायिक बाजू ठरते.
‘टेलरस्मार्ट’च्या व्यवसाय प्रक्रियेतील पुढचा व ग्राहकांना भावणारा टप्पा म्हणजे त्यांचे शिवून तयार झालेले कपडे ठरल्यादिवशी त्यांच्या घरी आवर्जुन पोचते केले जातात. यासाठी नेहमीच विशेष काळजी घेतली जाते. आज कपडे बाजारात अव्वल दर्जाच्या म्हणजेच ‘ब्रँडेड’ स्वरुपाच्या तयार कपड्यांच्या किमतीच्या तुलनेत आमच्या माध्यमातून तयार करून दिले जाणारे कपडे किमतीच्या संदर्भात सुमारे 40 टक्के स्वस्त किमतीत उपलब्ध होतात, असा प्रीतम ओन्स्कर यांचा दावा आहे.
या वेगळ्या व्यवसायाची पूर्व-पिठिका म्हणजे पुण्यातील मगरपट्टा येथे 2017 मध्ये वेगळी कल्पना व ग्राहकांना काहीतरी वेगळे व माफक खर्चात देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या ‘टेलरस्मार्ट’ शी केवळ 20 टेलरिंग कारागिर निगडित होते. मात्र संचालकांचे जिद्दीचे उद्योजक प्रयत्न, पाठपुरावा व प्रोत्साहन या साऱ्यांच्या यशस्वी समन्वयामुळे सध्या ‘टेलरस्मार्ट’ च्या व्यवसाय-व्यवहारात सध्या 800 टेलर्स संलग्न आहेत. सुरुवातीला केवळ पुरुष ग्राहकांच्या कपडे शिवण्यापासून सुरुवात झालेल्या या व्यवसायात आता महिला-पुरुष साऱ्यांचेच कपडे शिवून मिळत असून यातून मोठी व्यवसायवाढ सुरु आहे.
यातूनच खास ‘टेलरस्मार्ट’ साठी काम करणाऱ्या टेलर्सचे त्यांच्या व्यवसाय कौशल्यानुरुप वर्गीकरण करण्यात आले आहे. उदाहरणार्थ सध्या प्रीतम ओन्स्कर यांच्या नुसार त्यांच्यासाठी काम करणाऱ्या टेलर्सपैकी सुमारे 100 जण केवळ पुरुषांचे कपडे शिवण्यासाठी विशेष तज्ञ झाले आहेत. अशाच प्रकारे अन्य 100 जण महिलांच्या साडी पोलक्यांची शिलाई करीत असतात. महिलांना आवश्यक व आवडणाऱ्या अशा सणवार व विशेष कार्यक्रम समारंभासाठी कपडे शिवून देणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या विशेष कारागिरीमुळे संबंधित ग्राहकाचे समाधान व त्यातून व्यवसाय वाढ होत आहे.
आपल्या व्यवसायाचे यशस्वी वैशिष्ट्यां सांगताना प्रीतम ओन्स्कर आवर्जुन नमूद करतात की, त्यांच्या व्यवसाय रचनेत नव्याने सामील होऊ इच्छिणाऱ्या टेलर्सची कौशल्य विषयक विशेष चाचणी घेतली जाते. यासाठी परस्परपूरक व प्रसंगी सामूहिक कौशल्यांची जोड दिली जाते. यामागे मुख्य उद्देश कुशल कारागिरांच्या कौशल्यातून ग्राहकांचे संपूर्ण समाधान व त्याद्वारे व्यवसाय वाढ हा आहे. आता यालाच दर्जेदार कपड्यांचा पुरवठा माफक व सामान्यजनांना आवडेल, परवडेल अशा स्वरुपात व वाढत्या प्रमाणात करण्याचा प्रीतम ओन्स्कर यांचा मानस आहे.
दत्तात्रय आंबुलकर