For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तोयबा’च्या म्होरक्याला कंठस्नान

06:32 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘तोयबा’च्या म्होरक्याला कंठस्नान
Advertisement

जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथील चकमक

Advertisement

► वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे भारतीय सैनिकांनी लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका म्होरक्याला कंठस्नान घातले आहे. त्याचे नाव झाकीर अहमद गनी (वय 26) असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही चकमक बुधवारी सकाळी झाली. गनी याच्यासह त्याचा एक सहकारी दहशतवादीही असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेनजीकच्या वनप्रदेशात ही चकमक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

कंठस्नान घालण्यात आलेला दहशतवादी मूळचा कुलगाम जिल्ह्यातील मोटलहामा येथील रहिवासी होता. तो स्वयंघोषित तोयबा कमांडर होता. सप्टेंबर 2027 मध्ये त्याने त्याचे घर सोडले होते. त्यानंतर त्याचा त्याच्या कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. त्याने नंतर पाकिस्तानात जाऊन दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले असण्याची शक्यता आहे. त्याने ‘रेजिस्टन्स फ्रंट’ नामक दहशतवादी संघटनेत प्रवेश केला असल्याची शक्यताही जम्मू-काश्मीर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

3 जुलैपासून अभियान

3 जुलैला सीमेवर गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिकांना दोन दहशतवाद्यांची हालचाल शोपियानच्या वनप्रदेशात आढळली होती. त्यानंतर ते लपलेल्या भागाला वेढा घालण्यात आला. तसेच लपलेल्या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन सैनिकांनी केले. तथापि, त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. तसेच सैनिकांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सैनिकांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात गनी ठार झाला आहे. त्याचा अन्य सहकारी अद्याप या वनभागातच असून त्याला शोधण्यासाठी हा भाग पिंजून काढण्यात येत आहे. कंठस्नान घालण्यात आलेल्या गनी याच्याकडून रायफल जप्त करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबियांची संपर्क करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे.

दहशतवादी घटनांमध्ये घट

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सीमाभागांमधील गस्तही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात दहशतवादी घटनांमध्ये घट झालेली पहावयास मिळत आहे. सैनिकांकडून अनेक दहशतवादी ंमारले गेले आहेत. या प्रदेशात एकंदर शांतता असून राज्य प्रशासन आणि सेना यांच्यात समन्वय असल्याचेही दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.