तहव्वूर राणाचे होणार भारताकडे प्रत्यार्पण
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची मान्यता : मुंबईतील 26/11 हल्ल्याशी लागेबांधे, आर्थिक रसद पुरविल्याचा ठपका
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मुंबई हल्ल्यातील (26/11) दोषी तहव्वूर राणाला लवकरच भारताच्या हवाली करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. तहव्वूर राणाला 2009 मध्ये एफबीआयने अटक केली होती. त्याच्यावर मुंबई हल्ल्यासाठी आर्थिक मदत केल्याचा आणि हेडलीच्या साथीने हल्ल्याचे नियोजन केल्याचा आरोप आहे.
तहव्वूर राणा या पाकिस्तानी वंशाच्या पॅनेडियन व्यावसायिकाने गेल्यावषी फेडरल कोर्ट नाइनथ सर्किटमध्ये याचिका दाखल केली होती. सुनावणी होईपर्यंत आपल्याला भारताच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली होती. त्याची ही मागणी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती. मे 2023 मध्येही अमेरिकन न्यायालयाने राणाची याचिका फेटाळली होती. साहजिकच आता सर्वोच्च न्यायालयानेही तहव्वूरचे अपील फेटाळल्यामुळे त्याला पुढे अपील करता येणार नाही. आता तहव्वूरला भारतात आणण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे.
13 नोव्हेंबर 2024 रोजी राणाने कनिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. प्रत्यार्पण टाळण्यासाठी राणाची ही शेवटची संधी होती. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केले होते. मात्र, त्याची याचिका फेटाळण्यात आली होती. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवता येईल, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.
मुंबई हल्ल्याच्या 405 पानांच्या आरोपपत्रात राणाचे नाव आरोपी म्हणूनही नोंदवले गेले आहे. त्यानुसार, राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे. आरोपपत्रानुसार, राणा हा हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर करण्यात आलेल्या हल्ल्यात 166 लोक ठार झाले होते.
15 ऑगस्ट 2024 रोजी राणाचे अपील फेटाळले
प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध राणाचे अपील 15 ऑगस्ट 2024 रोजी अमेरिकन न्यायालयाने फेटाळले होते. अमेरिकन न्यायालयाने 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयात दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे म्हटले होते. भारताच्या ताब्यात जाऊ नये यासाठी पाकिस्तानी वंशाच्या तहव्वूर राणाने अमेरिकन न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती.
तहव्वूर राणा शिक्षेच्या प्रतिक्षेत
मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी फक्त अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले. कसाबला नंतर मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तहव्वूर राणा व्यतिरिक्त, आणखी एक मास्टरमाइंड सय्यद जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल देखील या हल्ल्यात सामील होता. अबू जुंदाल हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा एक भारतीय दहशतवादी होता. 2012 मध्ये त्याला अटक करण्यात आली. कसाबने त्याला ओळखले होते. तेव्हापासून तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तहव्वूर राणाला अजून शिक्षा झालेली नाही.
हेडली-राणाकडून कट-कारस्थान
मुंबई हल्ल्यातील आरोपी हेडलीला मदत करून आणि त्याला आर्थिक रसद पुरवून तहव्वूर राणा दहशतवादी संघटना आणि हेडलीसह अन्य दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता. हेडली कोणाला भेटत होता, काय बोलतोय याची माहिती राणाकडे होती. त्याला हल्ल्याचे नियोजन आणि काही लक्ष्यांची नावेही माहीत होती. राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग होता आणि त्याने दहशतवादी हल्ल्याला आर्थिक मदत केल्याचा गुन्हा केला असण्याची शक्मयता आहे, असे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.