तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी
रात्री 2 वाजता उपस्थित केले न्यायालयात, आता होणार कसून चौकशी
वृत्तसंस्था / .नवी दिल्ली
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार, मूळचा पाकिस्तानी आणि नंतर कॅनडाचा नागरिक तहव्वूर हुसेन राणा याला दिल्लीतील न्यायालयाने 18 दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे. त्याला गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. त्यानंतर रात्री दोन वाजता त्याला न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने एनआयएची मागणी मान्य करत त्याला 18 दिवसांची कोठडी देण्याची घोषणा केली. त्यानंतर त्याला अधिकृतरित्या कोठडीत घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी होणार आहे.
त्याला कोठडी देण्याचा निर्णय विशेष राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण प्राधिकरणाच्या (एनआयए) पतियाळा हाऊस न्यायालयाचे न्यायाधीश चंदरजीत सिंग यांनी दिला. त्यानंतर त्याला एनआयएच्या मुख्यालयात आणण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. अन्वेषण यंत्रणेच्या मुख्यालयात राणा याच्यासाठी विशेष सुरक्षित कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी एनआयए अधिकाऱ्यांनी राणाची जवळपास तीन तास कसून चौकशी करताना अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, बहुतांश प्रश्नांची उत्तरे ‘माहीत नाही, आठवत नाही’ अशा आशयाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनेक रहस्यभेद होण्याची शक्यता
या अठरा दिवसांमध्ये एनआयए राणा याची सखोल चौकशी करणार आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्याची इथ्यंभूत योजना त्याच्याकडून जाणून घेतली जाणार आहे. या हल्ल्यात पाकिस्तानातील कोणकोण समाविष्ट होते. 10 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले कसे, त्यांना साधनसामग्री आणि राहण्यासाठी जागा कोणी उपलब्ध करून दिली, भारतातील कोणाचा या कटात सहभाग होता काय आणि तो कशाप्रकारे होता, इतक्या सहजपणे हे दहशतवादी भारतात पोहचले कसे, मुंबई त्यांनी जवळपास अडीच दिवस ओलीस कशी ठेवली होती, मुंबई हल्ल्यानंतरच्या दहशतवाद्यांच्या योजना कोणत्या होत्या, भारताची सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ आहे, ही माहिती या कटाच्या सूत्रधारांना कोणी दिली, भारताच्या त्यावेळच्या प्रशासनातील लोकांचा यात सहभाग होता काय, इत्यादी अनेक प्रश्नांची सरबत्ती तहव्वूर राणावर केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
पुरावा भक्कम
राणा याच्या विरोधात एनआयएजवळ भक्कम पुरावा आहे. त्याचे हजारो ईमेल्स भारताच्या ताब्यात आहेत. या प्रत्येक ईमेलसंबंधी त्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत. हा कट वरवर दिसतो तेव्हढा लहान नाही. त्यापाठी अनेक आंतरराष्ट्रीय कुशक्ती आहेत. राणा याला त्यांची माहिती आहे. कारण तो प्रथमपासून या महाकटात सहभागी होता. त्यामुळे त्याच्याकडून स्फोटक माहिती अपेक्षित आहे.
दाऊद गिलानीचा घनिष्ट सहकारी
राणा हा या कटातील आणखी एक प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हीड कोलमन हॅडली याचा निकटचा सहकारी होता. अमेरिकेने संकलित केलेल्या पुराव्यांच्या अनुसार या कटाची संपूर्ण सविस्तर योजना गिलानी याने राणा याच्याकडे स्पष्ट केली होती. त्यामुळे राणा हा या कटाचा प्रथम माहितगार आहे. गिलानी याने त्याला कोणती माहिती दिली, याचाही पर्दाफाश आता होणार आहे.
भारतीयांची लायकी हीच आहे!
मुंबई हल्ला झाल्यानंतर राणा याने गिलानी याच्याशी संपर्क केला होता. या हल्ल्यात 200 हून अधिक निरपराध माणसे मारली गेली होती. भारतीय लोकांची लायकी अशाप्रकारे मरण्याचीच आहे, अशी अत्यंत हीन भाषा राणा याने गिलानी याच्याशी बोलताना केली होती, अशी माहिती अमेरिकेने केलेल्या अन्वेषणातून उघड झाली आहे. यापुढे आणखी माहिती उघड होणार हे स्पष्ट आहे. त्याने मृत भारतीयांसंबंधीही कोणती दयामाया दाखविली नव्हती. आता त्याला या सर्वाची पुरेपूर किंमत मोजावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी दिली आहे.
प्रदीर्घ कायदेशीर संघर्ष
तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात आणणे सोपे नव्हते. त्यासाठी भारत सरकारला गेली दहा वर्षे प्रखर कायदेशीर संघर्ष अमेरिकेत करावा लागला आहे. अमेरिकेत राणा याला 2020 मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर भारताने अमेरिकेच्या न्यायालयांमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये अनेक आवेदनपत्रे सादर केली होती. बराच काळ त्यांच्यावर कायदेशीर युक्तिवादांचा काथ्याकूट होत राहिला होता. तथापि, नंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दोनवेळा राणा याचा प्रत्यार्पण विरोधातील अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणा याचे प्रत्यार्पण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यांनीही ते आश्वासन पूर्ण केल्याने हे मोठे यश भारताला मिळाले आहे, असे दिसून येते.
भारतासाठी हे मोठे यश...
ड तहव्वूर राणा हाती लागणे हे भारताच्या मुत्सद्देगिरीचे आजपर्यंतचे मोठे यश
ड राणाच्या चौकशीतून पाकिस्तानातील अनेक बड्या धेंडाचा होणार पर्दाफाश
ड आता 18 दिवस एनआयए मुख्यालयात राणा याची कसून चौकशी होणार
ड एनआयए मुख्यालयात मोठी सुरक्षा व्यवस्था, राणासाठी विशेष सुरक्षित कक्ष