For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तहव्वूर राणा अखेर भारताच्या हाती

07:10 AM Apr 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
तहव्वूर राणा अखेर भारताच्या हाती
Advertisement

अमेरिकेकडून प्रत्यार्पण, दिल्लीत एनआयएने घेतला ताबा, न्यायालयात हजर करणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले आहे. अमेरिकेकडून त्याचे बुधवारी रात्री उशीरा प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याला विमानाने भारतात आणण्यात आले. त्याचा ताबा घेण्यासाठी भारताच्या तपास यंत्रणांचे अधिकारी अमेरिकेला गेले होते. विमान दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय तळावर आल्यानंतर त्याला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतले. आता त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. तसेच त्याच्यावर अभियोग सादर केला जाणार आहे.

Advertisement

फेब्रुवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती. तहव्वूर राणा याचे प्रत्यार्पण केले जाईल, असे आश्वासन या चर्चेत ट्रम्प यांनी दिले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणा याचा प्रत्यार्पणविरोधी अर्ज फेटाळल्याने त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर, भारताला हवा असलेला हा आंतरराष्ट्रीय कुख्यात दहशतवादी भारताच्या हातात आला आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग असून त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. दिल्लीतच त्याच्यावर पुढची कायदेशीर कारवाई होणार आहे. सध्या त्याला तिहार कारागृहात ठेवले जाणार असल्याचे समजते. सुरक्षिततेच्या कारणास्ताव सुनावणीवेळी त्याला व्हर्च्युअल माध्यमातून न्यायालयात हजर केले जाऊ शकते.

मुंबईवरचा भीषण हल्ला

पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी क्रूर हल्ला केला होता. या दहशतवाद्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 200 हून अधिक निरपराध लोक प्राणास मुकले होते. या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी ताज हॉटेलवरही काहीकाळ ताबा मिळविला होता. या हॉटेलातही हिंसाचार झाला होता. त्याचप्रमाणे हॉटेल ट्रायडंट आणि ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ येथेही हल्ला करण्यात येऊन काही अमेरिकन आणि इस्रायली नागरिकांचीही हत्या करण्यात आली होती. दहापैकी 9 दहशतवादी मुंबईच्या दहशतवादविरोधी दलाकडून ठार करण्यात आले. मात्र, अजमल कसाब हा एक दहशतवादी पकडला गेला होता. त्याला नंतर अनेक वर्षांनी फासावर लटकविण्यात आले होते. जवळपास अडीच दिवस मुंबईला दहशतवाद्यांनी ओलीस धरल्यासारखी परिस्थिती होती. भारतात आजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधला सर्वात मोठा हल्ला असे या घटनेचे वर्णन केले जाते.

सूत्रसंचालन पाकिस्तानातून

या हल्ल्याची योजना पाकिस्तानात करण्यात आली होती. अमेरिकेचा दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हीड कोलमन हेडली, तहव्वूर राणा आणि पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा संघटनेचा म्होरक्या हाफिझ सईद हे या हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार होते. मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून सूचना दिल्या जात होत्या आणि या सूचनांच्या अनुसार दहशतवादी कृती करत होते. तहव्वूर राणा हा या हल्ल्याची योजना बनविण्यात आघाडीवर होता, असा आरोप आहे.

पुढे काय होणार

तहव्वूर राणा याला एनआयएने ताब्यात घेतले असून त्याला आता न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येईल. त्याची कोठडी मागितली जाईल. ती मिळाल्यास कोठडीत त्याची कसून चौकशी केली जाईल. त्याच्यावर आरोपपत्र नोंद करुन अभियोग सादर केला जाणार आहे. मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर यापूर्वीच ठेवण्यात आला आहे. त्याच्यावरच्या अभियोगाची सर्व प्रक्रिया दिल्लीतच चालणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

विशेष सेल सज्ज

तहव्वूर राणा याला दिल्लीच्या तिहार कारागृहात डांबण्यात आले असून त्याच्यासाठी वेशेष अभेद्य कक्ष देण्यात आला आहे. त्याच्यावरील अभियोग कारागृहातच चालण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने हा अभियोग चालविण्यासाठी नरेंदर मान यांची नियुक्ती विशेष प्रॉसिक्युटर म्हणून केली आहे. ते त्याच्यावरचा अभियोग चालवतील. ही नियुक्ती 3 वर्षांसाठी असल्याची माहिती देण्यात आली.

तहव्वूर राणा कोण...

तहव्वूर हुसेन राणा हा 1961 मध्ये जन्मलेला कुख्यात दहशतवादी मूळचा पाकिस्तानातील आहे. नंतर त्याने कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले. कॅनडात त्याचा धंदा होता. तो पेशाने डॉक्टर असून त्याने पाकिस्तानी लष्करात सेवा बजावली आहे. तेथेच त्याला दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाले अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि डेन्मार्कमधील एका वृत्तपत्रावरील दहशतवादी हल्ल्याची योजना बनविण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याला 2009 मध्ये अमेरिकेत मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली होती. त्याला अमेरिपेत या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षाही झाली आहे.

भारताचे मोठे यश

  • तहव्वूर राणा याचा ताबा मिळविणे हे भारताचे मोठे राजनैतिक यश
  • त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई दिल्लीतच केली जाण्याचा निर्णय
  • दिल्ली विमानतळावर एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर तपासास प्रारंभ
Advertisement
Tags :

.