तहव्वूर राणाचे भारताला प्रत्यार्पण
राणाला फासावर लटकवण्याची मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकाच्या पित्याची मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 2008 मध्ये मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि अमेरिकेत शिक्षा भोगत असलेला तहव्वूर राणा याला भारताच्या आधीन करण्यात आले आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने त्याचा प्रत्यार्पणाविरोधातील अर्ज अंतिमरित्या फेटाळल्यानंतर त्याचे बुधवारी भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले. त्याला भारतात आणण्यासाठी सीबीआय आणि एनआयएचे अधिकारी अमेरिकेत पोहोचले होते. त्यांनी त्याचा ताबा घेतला असून त्याला भारतात आणण्यात येत आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत तो भारतात पोहचण्याची शक्यता आहे. भारतात त्याच्यावर दहशतवादाचा अभियोग चालणार आहे.
मुंबईवरील हल्ल्यात तहव्वूर राणा याची महत्वाची भूमिका होती. पाकिस्तानी दहशतवादी दाऊद सय्यद गिलानी याचा तो सहकारी होता. गिलानी हा अमेरिकेत डेव्हिड कोलनम हेडली या नावाने वावरत होता. गिलानी याची मुंबई हल्ल्यातील भूमिका महत्वाची होती. राणा आणि हेडली यांचे निकटचे संबंध पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आणि तिचा नेता हाफिझ सईद यांच्याशी होते. हे दोन दहशतवादी आणि ही संघटना यांनी मुंबई हल्ल्याची योजना तयार केली. पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या 10 दहशतवाद्यांनी राणा, हेडली आणि हाफीझ सईद यांच्या सूचनांच्या अनुसार मुंबई हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात 200 हून अधिक लोक ठार झाले होते. तर महाराष्ट्र दहशतवादविरोधी दलाच्या तीन उच्च अधिकाऱ्यांनाही या हल्ल्यात वीरगती प्राप्त झाली होती.
अमेरिकेत अभियोग
तहव्वूर राणा आणि हेडली यांच्याविरोधात अमेरिकेत अभियोग चालला होता. मुंबई हल्ल्यात काही अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता. परिणामी, अमेरिकेने ही कारवाई केली होती. तहव्वूर राणा याला अमेरिकेतील लॉस एंजल्स येथील कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते. गिलानी ऊर्फ हेडली यालाही अमेरिकेत शिक्षा ठोठावण्यात आली होती. भारताने या दोघांच्याही प्रत्यार्पणाची मागणी अमेरिकेकडे केली होती. तथापि, ती आजवर मान्य झाली नव्हती. आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यानंतर भारताची ही मागणी त्वरित मान्य झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांची ट्रम्प यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली होती. या चर्चेत तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली होती. ती ट्रम्प यांनी लगोलग मान्य केली. त्यामुळे आता राणा भारताच्या हाती लागला असून त्याला भारतात आणण्यात येत आहे.
व्हिडीओ माध्यमातून अभियोग
2013 मध्ये अमेरिकेतील न्यायालयाने गिलानीला मुंबई आणि कोपेनहेगन येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या आरोपांमध्ये 35 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. भारतानेही गिलानी याच्या विरोधात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अभियोग चालविला होता. गिलानी हा अद्यापही अमेरिकेत शिक्षा भोगत आहे. राणावर आता भारतात नव्याने अभियोग सादर केला जाणार आहे.
तहव्वूर राणाला फासावर लटकवा!
मुंबई हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचे कॉन्स्टेबल राहुल शिंदे यांचे पिता सुभाष शिंदे यांनी तहव्वूर राणा याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. राहुल शिंदे यांना वीरमरण मुंबईतील ताजमहाल हॉटेलमधील कारवाईच्या वेळी आले होते. दहशतवाद्यांनी ताजमहाल हॉटेलचा ताबा घेतल्यानंतर त्या हॉटेलात प्रथम घुसून कारवाई करणाऱ्यांपैकी एक राहुल शिंदे होते. तहव्वूर राणा याला मृत्यूदंड देण्यात आला तर राहुल शिंदे यांच्यासह सर्व हुतात्म्यांना न्याय मिळेल, असे सुभाष शिंदे यांनी स्पष्ट केले.