स्लमडॉग 33 टेम्पल रोड’मध्ये तब्बू
अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेत्री
पुरी जगन्नाथ यांचा आगामी अॅक्शन एंटरटेनर चित्रपट ‘स्लमडॉग 33 टेम्पल रोड’ चित्रपटातील तब्बूची पहिली झलक दाखविणारा व्हिडिओ समोर आला आहे. विजय सेतुपतिची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात गौरी हेगडे ही भूमिका तब्बू साकारत आहे. गौरी हेगडे एक निडर अधिकारी असून ती संकटांचा सामना करताना मागे हटत नसते.
गौरी हेगडे हे लोकांचा सामना करताना, त्यांना थप्पड लगावताना आणि कुठल्याही भीतीशिवाय भिडताना व्हिडिओत दिसून येते. एका दृश्यात विजय सेतुपतिच्या भूमिकेला ती ‘आम्ही प्रथम गोळी झाडतो आणि मग चर्चा करतो’ असे सांगताना दिसून येते. व्हिडिओच्या अखेरीस तिच्या भूमिकेची ओळख प्राप्तिकर विभागाची उपायुक्त म्हणून करून देण्यात आली आहे.
चित्रपटात विजय सेतुपति मुख्य भूमिकेत असून तो पुरी जगन्नाथसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. तर संयुक्ता ही नायिकेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळी, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे