‘भूत बंगला’मध्ये तब्बू
16 वर्षांच्या कालावधीनंतर अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. दोघेही ‘भूत बंगला’ चित्रपटासाठी एकत्र आले असून याची निर्मिती सुरू झाली आहे. या चित्रपटात आता एका दिग्गज अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.
आगामी काळात अक्षयचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार असून यातील ‘भूत बंगला’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अक्षयसोबत राजपाल यादव, असरानी आणि परेश रावल हे कलाकार देखील दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहेत.
आता या कलाकारांच्या यादीत दिग्गज अभिनेत्री तब्बूचे नाव जोडले गेले आहे. ती यापूर्वी प्रियदर्शन यांच्या ‘हेरा-फेरी’ या चित्रपटात अक्षयसोबत दिसून आली होती. तब्बू आणि अक्षयला एखाद्या कॉमेडी चित्रपटात एकत्र पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. यापूर्वी तब्बूने ‘गोलमाल अगेन’, ‘भूल भुलैया 2’ यासारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अक्षय कुमारने यापूर्वी 2010 मध्ये प्रदर्शित ‘खट्टा-मीठा’ या चित्रपटाकरता प्रियदर्शन यांच्यासोबत काम केले होते. तर त्याचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट 2 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्बूसोबत अभिनेत्री वामिका गब्बी देखील दिसून येणार आहे.