अनुभव सिन्हाच्या चित्रपटात तापसी पन्नू
सामाजिक विषयावर बेतलेला असणार चित्रपट
चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा हे प्रामुख्याने सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट तयार करत असतात. त्यांचे चित्रपट संदेश देणारे असतात. ‘मुल्क’ हा चित्रपट एक कोर्ट रुम ड्रामा धाटणीचा होता आणि यात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होती. आता सिन्हा पुन्हा एकदा पन्नूसोबत एका गंभीर सामाजिक मुद्द्यावर चित्रपट निर्माण करणार आहेत.
अनुभव सिन्हा यांचा हा चित्रपट समाजाचे गंभीर आणि ज्वलंत मुद्दे उपस्थित करणारा असेल. हा चित्रपट ‘मुल्क’सारखा असेल, परंतु त्याचा सीक्वेल नसणार आहे. तापसी पन्नूने यापूर्वी सिन्हाच्या दिग्दर्शनातील आणखी दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मुल्क’ आणि ‘थप्पड’ या चित्रपटात तापसीने दमदार अभिनय केला होता. आता अनुभव सिन्हाच्या दिग्दर्शनात तापसीचा हा तिसरा चित्रपट असेल, परंतु या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
अनुभवच्या या चित्रपटात तापसीसोबत मनोज पहवा आणि कुमूद मिश्रा यासारखे कलाकारही महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटासाठी अन्य कलाकारांची सध्या निवड केली जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण एप्रिलमध्ये सुरू होणार आहे.
अनुभव सिन्हाच्या चित्रपटाबरोबरच तापसी आणखी काही चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. तापसी अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘गांधारी’मध्ये काम करत असून यात ती एका मातेची भूमिका साकारत असून यात ती अपहृत मुलीला वाचविताना दिसून येणार आहे. तसेच तापसी ही ‘वो लडकी हैं कहां’ चित्रपटात काम करत असून हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. यात ती प्रतीक गांधीसोबत दिसून येणार आहे.