‘टाटा’च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत टी.व्ही.नरेंद्रन आघाडीवर
टाटा सन्समध्ये चंद्रशेखरन यांची जागा घेण्याची शक्यता
वृत्तसंस्था/मुंबई
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अचानक राजीनाम्यानंतर नवीन उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. 13 ऑगस्ट रोजी, सर दोराबजी टाटा ट्रस्टने पाच सदस्यांची निवड समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या पदासाठी टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन आघाडीवर आहेत. नरेंद्रन 1988 पासून टाटा समूहाशी जोडलेले आहेत; त्यांची संपूर्ण कारकीर्द टाटा स्टीलमध्येच व्यतीत झाली आहे. चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिला असला तरी, ते फेब्रुवारी 2027 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील; म्हणजेच ते आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याची माहिती आहे.
पाच सदस्यांची समिती नवीन अध्यक्षांचा निर्णय घेईल
टाटा सन्सच्या नियमांनुसार, अध्यक्षांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांची एक विशेष समिती गठित केली जाते. नावांची छाननी केल्यानंतर, समिती मुलाखती घेते आणि त्यानंतर टाटा सन्सच्या बोर्डाला अंतिम उमेदवाराची शिफारस करते.
3 सदस्य : सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टद्वारे नामनिर्देशित.
1 सदस्य : टाटा सन्स बोर्डाद्वारे नामनिर्देशित.
1 स्वतंत्र सदस्य : टाटा सन्स बोर्डाद्वारे निवडलेला तटस्थ सदस्य.
नरेंद्रन यांच्या नावाची चर्चा होण्याची तीन कारणे...
कठीण काळात उत्कृष्ट कामगिरी: जेव्हा नरेंद्रन यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा टाटा स्टील प्रचंड कर्ज, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि परदेशातील महागड्या अधिग्रहणांच्या समस्यांशी झुंजत होती. त्यांनी कर्ज कमी करण्यावर, रोख प्रवाहामध्ये सुधारणा करण्यावर आणि कंपनीची देशांतर्गत स्थिती बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले. तसेच, यूके आणि नेदरलँड्समधील कठीण पुनर्रचना निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी केली.
टाटा संस्कृतीची सखोल समज: 2016 मधील सायरस मिस्त्राr वाद प्रकरणानंतर, टाटा समूहाने आपल्या दीर्घकालीन परंपरा, मूल्ये आणि समूहाशी असलेली एकत्वाची भावना जपण्यावर विशेष भर दिला आहे. चंद्रशेखरन यांच्याप्रमाणेच, नरेंद्रन हे देखील जवळपास चार दशकांपासून टाटा समूहाचा भाग आहेत आणि त्यांना समूहाच्या कार्यपद्धतीची व तत्त्वांची सखोल जाण आहे. कार्यकारी अनुभव: अध्यक्षपदाची भूमिका केवळ दैनंदिन कामकाज सांभाळण्यापुरती मर्यादित नसते; त्यासाठी भांडवलाचे योग्य वाटप करणारा आणि धोरणात्मक निर्णय घेणारा (स्ट्रॅटेजिस्ट) म्हणून काम करणे आवश्यक असते.
निवड प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे: चॅरिटी कमिशनरच्या (धर्मादाय आयुक्त)
आदेशामुळे निर्माण झालेली गुंतागुंत. नवीन अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत प्रशासकीय आणि कायदेशीर अडथळे येत आहेत. महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरच्या निर्देशामुळे, ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ सध्या आपल्या विश्वस्तांच्या (ट्रस्टींच्या) बैठका घेऊ शकत नाही.
नोएल टाटा हंगामी अध्यक्ष का होऊ शकत नाहीत?
2016 मध्ये जेव्हा सायरस मिस्त्राr यांना पदावरून हटवण्यात आले, तेव्हा रतन टाटा यांनी वयाच्या 78 व्या वर्षी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, यावेळी नोएल टाटा तो मार्ग स्वीकारू शकत नाहीत. 2022 मध्ये ‘टाटा सन्स’च्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली, ज्यानुसार ‘टाटा ट्रस्ट्स’चे अध्यक्ष एकाच वेळी ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष म्हणून काम करू शकत नाहीत. दोन्ही पदे एकाच वेळी भूषवणारे रतन टाटा हे शेवटचे व्यक्ती होते.
नोएल टाटा यांची भूमिका काय असेल?
नोएल टाटा हे या नोव्हेंबरमध्ये 70 वर्षांचे होत आहेत. टाटा समूहाच्या धोरणानुसार, ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह’ (कार्यकारी नसलेल्या) संचालकांसाठी निवृत्तीचे वय 70 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या तरतुदीनुसार, ते समूहातील इतर कंपन्यांच्या संचालक मंडळांतून निवृत्त होतील. तथापि, ते ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळावर संचालक म्हणून कार्यरत राहतील, कारण ते ट्रस्टचे नामनिर्देशित सदस्य आहेत. ट्रस्टच्या नामनिर्देशित सदस्यांना निवृत्तीच्या वयोमर्यादेचे नियम लागू होत नाहीत.