टी. बी. जयचंद्र आजपासून हंगामी विधानसभा अध्यक्ष
13 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन : दुष्काळ, कावेरी पाणी अन् बिडदी टाऊनशिपवर चर्चेची शक्मयता
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर
मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री टी. बी. जयचंद्र यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मनधरणीनंतर हंगामी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारण्यास होकार दिला आहे. त्यानुसार सोमवारपासून ते हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. 13 ते 27 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या 10 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचे टी. बी. जयचंद्र संचालन करतील. सोमवारी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन ते कामकाज सुरू करणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अलीकडे निधन झालेल्या माजी मंत्री डी. सुधाकर, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चन्नम्मा देवेगौडा यांच्यासह अन्य मान्यवरांना श्र्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून नियमित कामकाज सुरू होईल.
डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा डॉ. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची आणि 12 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या सर्व मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. तथापि, गेल्या सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री झालेल्या 19 मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करायचे आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्मयता आहे.
प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना, विधेयके सादर करणे, नवीन विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीसाठीचा निवडणूक प्रस्ताव, अर्ध्या तासाची चर्चा, शून्य प्रहर, नियम 69 अंतर्गत सार्वजनिक महत्त्वाच्या तातडीच्या बाबींवर अल्पकालीन चर्चा, शासकीय ठराव आणि अहवाल सादर करणे यासह कामकाजाची यादी तयार करण्यावर हंगामी विधानसभा अध्यक्ष टी. बी. जयचंद्र लक्ष केंद्रित करणार आहेत.
विविध पदांवर काम करण्याचा अनुभव
16 व्या विधानसभेचे आठवे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सोमवारपासून आवश्यक तयारी सुरू केली जाईल, असे हंगामी सभाध्यक्ष टी. बी. जयचंद्र यांनी स्पष्ट केले आहे. ते 1978 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले असून त्यांना सातवेळा आमदार, दोनवेळा मंत्री, विधानसभेचे उपनेते आणि दिल्लीतील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी अशा विविध पदांवर काम करण्याचा अनुभव आहे.
महत्त्वाचे मुद्दे गाजणार
राज्यातील पावसाची स्थिती, दुष्काळ, तामिळनाडूला कावेरीचे पाणी सोडणे आणि बिडदी टाऊनशिप या विषयांवर अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्मयता आहे.
राजीनाम्यासाठी दबाव टाकला : होरट्टींचे राज्यपालांना पत्र
विधानपरिषदेचे हंगामी सभापती बसवराज होरट्टी यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि बी. के. हरिप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली काही नेते आपल्या दालनात आले. त्याच दिवशी राजीनामा देण्याचा दबाव टाकून आपल्याकडून राजीनामा घेण्यात आला, असा दावा होरट्टी यांनी पत्रात केला आहे. आपण तातडीने राजीनामा देण्यास तयार नसतानाही दबाव आणण्यात आल्याचे त्यांनी राज्यपालांना कळविले आहे.