For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समन्वयवादी कॉम्रेड

06:36 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
समन्वयवादी कॉम्रेड
Advertisement

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या निधनाने देश एका मध्यमवर्गी व समन्वयवादी राजकारण्याला मुकला आहे. हिंदी, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, सखोल अभ्यास, जनतेप्रतीची अतूट बांधिलकी असलेल्या येचुरी यांनी पोथीनिष्ठ विचारांच्या पलीकडे जाऊन कायमच देशहिताला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ डाव्या चळवळीचेच नव्हे, तर संबंध देशाचे नुकसान झाले आहे, असे म्हणावे लागेल. भारताच्या राजकारण व समाजकारणात आजवर विविध पक्षातील मंडळींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामध्ये येचुरी यांचाही ठळकपणे उल्लेख करता येईल. येचुरी मूळचे तामिळनाडूचे. त्यांचा जन्म चेन्नईचा. मात्र, शिक्षणासाठी दिल्लीत गेलेला हा नेता खऱ्या अर्थाने रमला तो देशाच्या या राजधानीतच. दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेज व जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थात जेएनयूमध्ये त्यांचे शिक्षण झाले. जेएनयूमधून डाव्या चळवळीतील अनेक नेतृत्वे घडली, देशाच्या राजकारणात पुढे आली. येचुरी हे त्यापैकीच एक. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थ्यांच्या संघटनेत त्यांची खऱ्या अर्थाने घडण झाली. आहे रे नाही रे, गरीब, श्रीमंत, श्रमिकांचे हक्क यांसह अभावग्रस्तांच्या विविध प्रश्नांची मनामध्ये भाजणी झाली, ती याच काळात. विद्यार्थिदशेतच त्यांनी राजकारणात प्रवेश केला व आपल्या अभ्यासू व समन्वयशीलतून माकपशी ते जोडले गेले. 1984 मध्ये माकपच्या केंद्रीय  समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली. 1992 मध्ये पोलिस ब्युरोसाठी निवड झाल्यावर खऱ्या अर्थाने त्यांची छाप पक्षाच्या ध्येय धोरणांमध्येही उमटू लागली. डावे म्हणजे पोथिनिष्ठ, हटवादी असा एक समज आहे. परंतु, येचुरी यांनी या साऱ्याला छेद देत आपल्या उदारमतवादी दृष्टीकोनाचे वेळोवेळी दर्शन घडवले. राजकारण, समाजकारण असो वा अर्थकारण. त्यांच्यातील उदारमतवाद नेहमीच उठून दिसला. 2005 ते 2017 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. या काळात त्यांनी जनमानसाचे जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न ऐरणीवर आणले. त्यांनी केलेली भाषणे, जनतेच्या प्रश्नांवर घेतलेल्या भूमिका व एकूणच संसदेतील त्यांचे वागणे, बोलणे, हे आजच्या राजकारण्यांसाठी अनुकरणीय ठरते. मुळात येचुरी यांना काळाचे भान होते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकाही कालसुसंगत अशाच राहिल्या. 1990 नंतर देशामध्ये आघाड्यांच्या सरकारचा ट्रेंड आला. चंद्रशेखर यांच्या सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतल्यानंतर अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली होती. मात्र, या टप्प्यावर देशात एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारे आकाराला आली. त्यामागे येचुरी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. 1996 मध्ये तर पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. ही सुवर्णसंधी आपण गमावू नये, असे येचुरी यांचे प्रामाणिक मत होते. मात्र, प्रकाश कारत व अन्य कडव्या डाव्यांच्या अडेलतट्टूपणामुळे ही संधी हिरावली गेली. त्यानंतर बसूंनीही ही ऐतिहासिक चूक असल्याचे उद्गार काढावेत, यातच सर्व आले. 2004 हे वर्ष डाव्या चळवळीसाठी बहारदारच म्हणता येईल. कारण याच वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत माकपचे तब्बल 43 खासदार निवडून आले. खरंतर काँग्रेसशी युती केली जाऊ नये, असाच एकूण डाव्या नेत्यांचा सूर होता. मात्र, बदलत्या काळाची पावले ओळखणाऱ्या येचुरी यांनी वेगळी भूमिका घेतली. यूपीएला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते हरकिशनसिंह सूरजीत यांच्यासाबेत त्यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली. मात्र, भारत-अमेरिका यांच्यातील अणूकराराच्या मुद्द्यावर युपीए 1 चा पाठिंबा काढण्याचा निर्णय कारत व प्रभुतींनी घेतला. या निर्णयाला येचुरी यांनी उघडउघड विरोध दर्शविला होता. राजकारणात कुठे पुढचे पाऊल टाकावे व कुठे पाऊल मागे घ्यावे, याची त्यांना जाण होती. दुर्दैवाने कारत व अन्य मंडळींनी आपला हेका कायम ठेवला. त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकांमध्ये डाव्यांना भोगावे लागल्याचा इतिहास फार जुना नाही. येचुरी यांचे वेगळेपण म्हणजे त्यांचे सर्वपक्षीयांशी असलेले संबंध होय. एकीकडे गांधी कुटुंबीयांशी त्यांचा असलेला संवाद अनेकांना बुचकळ्यात टाकत असे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही ते मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसत असत. याशिवाय छोट्या छोट्या अनेक घटकपक्षांपासून मुख्य धारेतील पक्षांपर्यंत प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाशी वा उपनेतृत्वाशी त्यांचा संपर्क असे. खरंतर येचुरी यांचा मूळ पिंड हा संवादी. विरोधाला विरोध करण्यापेक्षा संवादावर ते भर देत असत. एखाद्या प्रश्नातून वा समस्येतून मध्यममार्ग कसा काढता येईल, परस्परांमध्ये समन्वय कसा घडविता येईल, यावर त्यांचा कटाक्ष असे. प्रसन्न व हसरा चेहरा, त्यावर झळाळणारी विद्वता आणि माणसे जोडण्याची कला ही त्यांची बलस्थाने होती. त्या बळावरच येचुरींनी देशभर आपला प्रभाव वाढवत नेला. खरेतर त्यांच्याकडे महासचिवपदाची जबाबदारी आली, ती पक्षाच्या उतरणीच्या काळात. अशा कठीण काळातही त्यांनी पक्षामध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले. इंडिया आघाडीच्या निर्माणामध्येही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. वैचारिक तडजोड व प्रॅक्टिकल निर्णय यातील सीमारेषा डाव्या विचारसरणीच्या या नेत्याला चांगलीच ठाऊक होती. म्हणूनच विचारांशी कोणतीही तडजोड न करता लोकहितकारक भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी दाखविले. या खऱ्याखुऱ्या कॉम्रेडला लाल सलाम!

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.