सिल्वेस्टर स्टेलोन पत्नीपासून होणार विभक्त
एक श्वान ठरला कारणीभूत
हॉलिवूडचा रॅम्बो सिल्वेस्टर स्टेलोन आणि पूर्वाश्रमीची मॉडेल जेनिफर फ्लेविन हे घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे. दोघांच्याही विभक्त होण्याच्या निर्णयामागे एक श्वान असल्याचे सांगण्यात येत आहे. सिल्वेस्टर हे सुरक्षेसाठी एक रॉटविलर श्वान बाळगू इच्छित होते, तर जेनिफरला हे मान्य नव्हते.
जेनिफरने फ्लोरिडाच्या एका न्यायालयात स्वतःचा विवाह संपुष्टात आणण्यासाठी अर्ज केला आहे. घटस्फोट घेण्यामागील कारण वैयक्तिक असल्याचे म्हणत तिने कुटुंबात सर्वकाही सुरळीत असल्याचा दावा केला आहे.
तर सिल्वेस्टर स्टेलोन हे सध्या ओक्लाहोमा येथे चित्रिकरणात व्यस्त असल्याने त्यांच्यासाठी ही घडामोड धक्कादायक आहे. स्टेलोन यांनी यांनी स्वतःच्या पत्नीचा चेहरा असलेला टॅटू झाकला आहे. चाहत्यांना हा प्रकार आढळून आल्यावर सोशल मीडियावर या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे.
सिल्वेस्टर अन् जेनिफरने 1988 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 1997 मध्ये दोघेही विवाहाच्या बंधनात अडकले होते. दोघांच्याही वयात 22 वर्षांचे अंतर आहे. स्टेलोन सध्या 76 वर्षांचे तर फ्लेविन 54 वर्षांची आहे. या दोघांनाही तीन अपत्यं असून सोफिया (25 वर्षे), स्कार्लेट (20 वर्षे) अन् सिस्टीम (24 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. अभिनेत्याला यापूर्वीच्या विवाहापासून एक मुलगा तसेच दिवंगत स्टारलिन राइट यांच्यासोबतच्या नात्यातून आणखी एक मुलगा आहे.