सय्यद मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धा आजपासून
आयपीएलच्या लिलावामुळे खेळाडूंचे लक्ष चांगल्या कामगिरीवर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2024 च्या क्रिकेट हंगामातील सय्यद मुस्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेला विविध ठिकाणी शनिवारपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठीचा क्रिकेटपटूंचा लिलाव सौदी अरेबियातील जेधा येथे 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी होणार असल्याने हार्दीक पांड्या तसेच मोहम्मद शमी आणि काही आघाडीचे क्रिकेटपटू आपल्या चांगल्या कामगिरीवर भर देण्यासाठी प्रयत्न करतील.
प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामातील सय्यम मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धा ही टी-20 प्रकारातील महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंवर आयपीएलच्या क्रिकेटपटूच्या लिलावामध्ये मोठी बोली लावून खरेदी करण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन संघामध्ये हार्दीक पांड्याला आपले स्थान राखण्यासाठी मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करुन आपीएल स्पर्धेकरिता फ्रांचायझींना आकर्षित करावे लागेल. प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामात देशात होणाऱ्या विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये आघाडी क्रिकेटपटूंना सहभागाची सक्ती बीसीसीआयच्या धोरणांनुसार करण्यात आली असल्याने आता बडोद्याच्या अष्टपैलु हार्दीक पांड्याला सय्यद मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाचे प्रतिनिधीत्व करताना चांगली कामगिरी करणे जरुरीचे आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला आयसीसीच्या गेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापतीने चांगलेच त्रासले आहे. या दुखापतीमुळे तो अनेक महिने क्रिकेटपासून अलिप्त होता. तंदुरुस्तीची समस्या त्याला चांगलीच भेडसावत होती. अलिकडेच शमीने रणजी क्रिकेट स्पर्धेत आपले बंगाल संघाकडून पुनरागमन केले. मध्यप्रदेश विरुद्ध अलिकडेच झालेल्या रणजी सामन्यात शमीने 7 गडी बाद करुन निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. मोहम्मद शमी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी आतुरलेला असून 34 वर्षीय शमी आता ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान आयपीएल स्पर्धेसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात शमीचा विचार निश्चितच केला जाईल.
मुंबई संघातील श्रेयश अय्यर 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केले होते. हरियाणाचा यजुवेंद्र चहल, श्रेयश अय्यर तसेच शाहरुख खान, अभिषेक पोरल, कर्नाटकाचा अभिनव मनोहर, राजस्थानचा मानव सुतार, विदर्भचा करुण नायर, बडोदा संघाचा कृणाल पांड्या, राजस्थानचा दीपक हुडा यांच्या कामगिरीवर निवड सदस्यांचे लक्ष राहिल.