Kolhapur : शॉर्ट सर्किटच्या आगीत सय्यद कुटुंबाचे संसार स्वप्न भस्मसात
कोल्हापुरात शॉर्ट सर्किटची भीषण आग
कोल्हापूर : झूम प्रकल्पामध्ये कष्ट करुन राबणारे सय्यद कुटूंब... घर नव्याने बांधण्यासाठी पै... अन.... पै जमा करत होते. मात्र मंगळवारी सकाळी शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमध्ये प्रापंचिक साहित्यासोबत चार ते पाच लाखांची रोकड, सोन्याचे दागिने जळून राख झाले. याचसोबत सय्यद कुटूंबाच्या स्वप्नाचीही राख रांगोळी झाली... साहेब आमच्या कष्टाचे सगळंच गेलं अशी आर्त हाक ऐकताना उपस्थितांचे डोळेही पाणवले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवश्या मारूती मंदिरामागे वहुवाडी हा परिसर आहे. याठिकाणी रशीद सय्यद (वय ५०) हे पत्नी, मुलांसोबत राहण्यास आहेत. रशीद हे झूम प्रकल्पामध्ये काम करतात. आज सकाळी ते कामानिमित्त बाहेर पडले. तसेच पत्नी रेश्मा, मुलगा रमजानही कामासाठी घराबाहेर पडले होते. छोट्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी सैनाजही बाहेर गेल्या असल्याने घरी कोणीच नव्हते. याचवेळी शॉर्ट सर्किटने त्यांच्या घराला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र यामध्ये सय्यद कुटुंबाच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली.
पिंजऱ्यातच पोपट जळून खाक सय्यद यांनी त्यांच्या घरी एक पोपटपाळला होता. पिंजऱ्यात त्याच्यासाठी दोन पेरूही ठेवण्यात आले होते. आग पसरत गेल्याने हा पिंजऱ्यालाही आगीची झळ बसली. यामध्ये पोपटही पोळून निघाला. पंखासह पाठिचा भाग जळाल्याने त्याचाही पिंजऱ्यातच अंत झाला. हा पिंजरा बाहेर काढल्यानंतर अनेकांचे मन हेलावले.