हेस्कॉमच्या अध्यक्षपदी सय्यद अज्जमपीर काद्री
मुख्यमंत्र्यांनी पोटनिवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळला
प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे सय्यद अज्जमपीर काद्री यांनी बंडखोर उमेदवार म्हणून अर्ज केला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांना बेंगळूरला बोलावून निजद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचे सांगून माघार घेण्यास सांगितले होते. आता सिद्धरामय्या यांनी दिलेला शब्द पाळला असून सय्यद अज्जमपीर काद्री यांना हेस्कॉमचे (हुबळी वीजपुरवठा निगम) अध्यक्षपद दिले आहे.
शिग्गाव पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी काद्री यांनी केली होती. मात्र, निवडणूकपूर्व सर्वेक्षणात काद्री यांच्यापेक्षा यासीर खान पठाण यांना तिकीट देणे योग्य असल्याचा निष्कर्ष निघाला होता. त्यामुळे यासीर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे संतप्त काद्री यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करत काँग्रेस नेत्यांना धक्का दिला होता. त्यामुळे मुस्लीम मते विभागण्याची भीती असल्याने काँग्रेस नेत्यांनी सय्यद अज्जमपीर काद्री यांना बेंगळूरला बोलावून मनपरिवर्तन केले होते.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना तू काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्याचे प्रयत्न कर. उमेदवारी अर्ज मागे घेतला तर एखाद्या निगम किंवा महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे काद्री यांनी पोटनिवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. तसेच अधिकृत उमेदवार यासीर खान पठाण यांच्यावतीने प्रचारही केला. शनिवारी मतमोजणीनंतर शिग्गावमध्येही काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. निकालानंतर दोनच दिवसात सिद्धरामय्या यांनी काद्री यांची हेस्कॉमच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.