स्वीत्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी लागू
कायद्याचे उल्लंघन केल्यास 96 हजारांचा दंड : अशाप्रकारचा निर्णय लागू करणारा 7 वा युरोपीय देश
वृत्तसंस्था/ बर्न
स्वीत्झर्लंडमध्ये बुधवारपासून महिलांवर सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा अन्य पद्धतीने पूर्णपणे चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 1 हजार स्वीस प्रँक म्हणजेच सुमारे 96 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे. स्वीत्झर्लंडमध्ये 2021 साली झालेल्या जनमत चाचणीत 51.21 टक्के नागरिकांनी बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने मतदान केले होते. यानंतर बुरख्यावर बंदीवरून कायदा आणला गेला होता, जो 1 जानेवारीपासून लागू झाला आहे.
स्वीत्झर्लंडपूर्वी बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बुल्गारियामध्ये देखील यासंबंधी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानंतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच शासकीय कार्यालये, सार्वजनिक परिवहन सेवा, दुकाने आणि अन्य ठिकाणी स्वत:चा चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही.
2022 मध्ये स्वीत्झर्लंडच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह राष्ट्रीय परिषदेत चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यासंबधी मांडले गेलेल्या विधेयकावर मतदान झाले होते. या विधेयकाच्या बाजूने 151 सदस्यांनी तर विरोधात 29 सदस्यांनी मतदान केले होते. यानंतर या विधेयकाला कायद्याचे स्वरुप देण्यात आले होते. संबंधित प्रस्ताव उजव्या विचारसरणीचा पक्ष स्वीस पीपल्स पार्टीने मांडला होता. तर सेंट्रल व ग्रीन्स पार्टी याच्या विरोधात होती.
हा कायदा मुस्लीम महिलांना चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर सांस्कृतिक मूल्य आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेसाठी हा कायदा आवश्यक असल्याचे दुसऱ्या गटाचे सांगणे आहे.
ल्यूसर्न युनिव्हर्सिटीच्या 2021 च्या एका संशोधनानुसार स्वीत्झर्लंडमध्ये बुरखा परिधान करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तेथे केवळ 30 महिलांकडून हिजाब परिधान केला जात होता. 2021 पर्यंत स्वीत्झर्लंडच्या 86 लाखाच्या लोकसंख्येत सुमारे 5 टक्के मुस्लीम होते, ज्यातील बहुतांश तुर्किये, बोस्निया आणि कोसोवोतील होते. त्यापूर्वी 2009 मध्ये जनमतचाचणीद्वारेच मीनारांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती. हा प्रस्ताव देखील एसव्हीपीनेच मांडला होता. ही मीनारे इस्लामीकरणाचे संकेत असल्याचे या प्रस्तावात म्हटले गेले होते.
दक्षिण आशियात बुरखा, युरोपमध्ये हिजाब
बुरखा हा प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियातील मुस्लीम महिला परिधान करतात. तर युरोप आणि आखाती देशांमध्ये हिजाबचा अधिक वापर दिसून येतो. बहुतांश मुस्लिम देशांमध्ये याचा वापर होतो. मागील काही काळात युरोपमध्ये स्थलांतरितांवरून मोठा रोष निर्माण झाला आहे. या स्थलांतरितांमधील मुस्लीम धर्मीयांवरून युरोपीय नागरिकांमध्ये संताप दिसून येत आहे. याचमुळे अनेक युरोपीय देशांमध्ये आता उजव्या विचारसरणीचे पक्ष लोकप्रिय ठरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर युरोपीय देशांमध्ये आता स्थलांतरितांच्या विरोधात अनेक निर्णय घेतले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.