टिश्यू कल्चर केळी लागवडीकडे वळा!
बागायत विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : दिर्घकालीन उत्पादन, अधिक नफा
बेळगाव : केळी हे देशातील सर्वात महत्त्वाच्या फळांपैकी एक मानले जाते. देशात केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात असले तरी कर्नाटकातील उत्पादकता राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे केळी उत्पादनात वाढ करण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचाविण्यासाठी बागायत विभागाने पारंपरिक केळीच्या रोपांऐवजी शास्त्रीय तंत्रज्ञानावर आधारित रुती संवर्धन (टिश्यू कल्चर) केळीच्या रोपांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. भारतात दरवषी सुमारे 9 लाख हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. या क्षेत्रातून सुमारे 383 लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते आणि प्रतिहेक्टर सरासरी उत्पादकता 42 मेट्रिक टन इतकी आहे. मात्र कर्नाटकात सुमारे 46 हजार हेक्टर क्षेत्रावर केवळ 12 लाख मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते.
त्यामुळे राज्यातील उत्पादकता प्रतिहेक्टर केवळ 26 मेट्रिक टन इतकी असून ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या जुन्या रोपांवर अवलंबून असल्याने उत्पादनावर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक प्रयोगशाळीय तंत्रज्ञानातून विकसित केलेल्या टिश्यू कल्चर रोपांचा वापर करून उत्पादन वाढविणे शक्य असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. पारंपरिक पद्धतीतील केळीची रोपे अनेकदा रोगग्रस्त किंवा किडींचा प्रार्दुभाव झालेली असू शकतात. त्यामुळे एकदा बागेत रोगाचा प्रसार सुरू झाल्यास संपूर्ण लागवडीवर त्याचा परिणाम होतो. याउलट टिश्यू कल्चर रोपे नियंत्रित प्रयोगशाळीय वातावरणात तयार केली जात असल्याने ती पूर्णपणे रोगमुक्त आणि निरोगी असतात. या रोपांचा जगण्याचा दरही अधिक असतो. परिणामी लागवडीनंतर रोपे वाळण्याचे किंवा नष्ट होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुनर्लागवडीवरील अतिरिक्त खर्च वाचतो.
एकसमान वाढ, एकाचवेळी काढणी
पारंपरिक रोपांपासून लागवड केलेल्या बागांमध्ये झाडांची वाढ असमान स्वरुपाची असते. काही झाडे लवकर वाढतात तर काही मागे राहतात. त्यामुळे फळांची काढणी वेगवेगळ्या टप्प्यांत करावी लागते. टिश्यू कल्चर रोपे मात्र एकाच जनुकीय गुणधर्मांवर आधारित असल्याने त्यांची वाढ एकसमान होते. त्यामुळे संपूर्ण बागेतील फळांची काढणी एकाच कालावधीत करणे शक्मय होते. यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील मागणीनुसार नियोजनबद्ध विक्री करून अधिक चांगला दर मिळविता येतो.
अधिक उत्पादन, उत्कृष्ट दर्जाची फळे
टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उत्पादनातील सातत्य आणि वाढ. या पद्धतीने घेतलेल्या पिकामध्ये फळांचे आकारमान मोठे, आकर्षक आणि एकसमान असते. बाजारात अशा दर्जेदार फळांना अधिक मागणी आणि चांगला भाव मिळतो. पारंपरिक पद्धतीत मात्र फळांच्या आकारमानात मोठी तफावत दिसून येते. काही घड मोठे तर काही लहान असतात. त्यामुळे बाजारमूल्यावर परिणाम होतो. टिश्यू कल्चर लागवडीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होते. टिश्यू कल्चर लागवडीत पाणी, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अधिक परिणामकारक वापर करता येतो. रोगांचे प्रमाण कमी असल्याने औषधांवरील खर्चही घटतो.
सुरुवातीचा खर्च जास्त, दीर्घकालीन फायदा अधिक
पारंपरिक रोपांची किंमत तुलनेने कमी असल्यामुळे अनेक शेतकरी त्यांनाच प्राधान्य देतात. मात्र तज्ञांच्या मते, सुरुवातीला टिश्यू कल्चर रोपांवर थोडा अधिक खर्च होत असला तरी दीर्घकालीन दृष्टीने हा खर्च फायदेशीर ठरतो. उत्पादनवाढ, कमी रोगप्रादुर्भाव, कमी देखभाल खर्च आणि बाजारात मिळणारा अधिक दर या सर्व बाबींचा विचार करता शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक आर्थिक लाभ मिळतो.
रोपांचे दरही परवडणारे
बागायत विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध करून दिली आहेत. एक्स अगर अवस्थेतील रोपाची किंमत केवळ 6 रुपये, 98 कप्प्यांच्या प्रोटे रोपाची किंमत 7 रुपये तर 4×6 इंच पॉलीबॅगमधील रोपाची किंमत 12 रुपये ठेवण्यात आली आहे. बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या रोपांची फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत व विश्वासार्ह स्रोतांकडूनच रोपे खरेदी करावीत. अधिक माहितीसाठी 7975736459 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.