स्विमींग पूलचा ‘जुगाड’
युरोप किंवा अमेरिकेएवढा तंत्रज्ञानाचा विकास आपल्या देशात झाला नसला, तरी ‘जुगाड’ करण्यात आपले लोक अत्यंत प्रवीण असतात, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या डोक्यातही येणार नाही, अशा युक्त्या योजून अत्यंत टाकावू वस्तूंपासून अनेक उपयुक्त वस्तू बनविल्या जातात. यालाच ‘जुगाड’ असे म्हणतात.
सध्या असाच एक व्हिडीओ लोकप्रिय झाला आहे. त्यात मुलांनी घरातल्या घरात बनविलेल्या जलतरण तलावाची दृष्ये आपल्याला पहावयास मिळतात. हा जलतरण तलाव किंवा स्विमींग पूल बनविण्यासाठी या मुलांनी विशेष खर्च केलेला नाही. तसेच पाणी साठविण्यासाठी ख•ाही खोदलेला नाही. हा जलतरण तलाव चक्क जाडसर पॉलिथिन कापडाचा आहे. घरातील खाटा चारी बाजूंना मांडून त्यांना ही पॉलिथिन शीट अडकवलेली आहे. त्यामुळे मध्ये जी खोलगट घळ निर्माण होते, तिच्यात पाणी भरुन मुले या पाण्यात खेळताना आणि पोहतानाही दिसून येतात. केवळ लहान मुलेच नव्हे, तर मोठी माणसेही या ‘होममेड’ जलतरण तलावात स्नानाचा आनंद घेताना दिसून येतात. या जलतरण तलावाची एकच समस्या आह. ती अशी की चुकून ही पॉलिथिन शीट फाटली, किंवा तिला चारी बाजूंनी लावलेला खाटांचा आधार निसटला, तर भस्सकन सगळे पाणी बाहेर पडण्याचा आणि त्यात खेळणारी मुळे खालच्या फरशीवर पडण्याचा धोका आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिलेल्या अनेकांनी, असले खेळ मुलांना करु देऊ नयेत, अशी सूचना केली आहे. तथापि, हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 1 कोटी लोकांनी इन्स्टाग्रामवर पाहिलेला आहे. तसेच त्याला लक्षावधी ‘लाईक्स’ही मिळालेले आहेत.
अनेकांनी या मुलांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी इतके पाणी कशाला वाया घालविलेत, असाही प्रश्न सोशल मिडियावर विचारला आहे. काही जणांनी अशा प्रकारे घरी जलतरणाची सोय करता येणे शक्य नाही, अशीही टिप्पणी केली आहे. पाहणाऱ्यांची मते काहीही असली तरी सध्या हा ‘जलतरण जुगाड’ बराच लोकप्रिय झालेला आहे ही बाब निश्चित आहे.