करंजाळेत जलतरणपटू अडकले रापणीत
करंजाळेतील दुर्घटना, मुंबईच्या कपिल अरोरास अटक : रापणकारांच्या विरोधाला न जुमानता स्पर्धेचे आयोजन,गोवा सरकारी प्रशासन व्यवस्थेचा कारभार चव्हाट्यावर
पणजी : करंजाळे समुद्रकिनारी शनिवारी, रविवारी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ‘ओशनमॅन’ या जलतरण स्पर्धेवेळी अनेक जलतरणपटू मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून जखमी झाल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखून काही जलतरणपटूंच्या पालकांनी तसेच काहींच्या प्रशिक्षकांनी समुद्रात उडी घेऊन स्पर्धकांना वाचविले. स्पर्धकांच्या पालकांनी त्यांच्या मुलांचा जीव धोक्यात घालणे, तसेच लाखो ऊपयांची प्रवेश फी आकारून फसवणूक केल्याप्रकरणी आयोजकाविरोधात पणजी पोलिसस्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (2), 125 अंतर्गत गुन्हा नोंद करून आयोजक कपिल अरोरा याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आयोजक संशयिताचे नाव कपिल अरोरा (50 मुंबई) असे आहे. देशाच्या विविध राज्यातून तसेच परदेशातील मिळून हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाकडून 8 ते 10 हजार ऊपये प्रवेश फी घेऊन एकूण सुमारे 75 ते 80 लाख ऊपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आयोजकाकडे कोणतेच नव्हते परवाने
आयोजकांनी या स्पर्धेसाठी कोणतेही सोपस्कर पूर्ण केले नव्हते. कपिल अरोरा याच्याकडे कोणत्याही संबंधित खात्याच्या परवानग्या नव्हत्या, असे घटना घडल्यानंतर आपणास कळाल्याचे स्पर्धकांच्या पालकांनी पत्रकारांना सांगितले. आयोजकांविरोधात पणजी पोलिसस्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर ते पत्रकांराशी बोलत होते.
या स्पर्धेत महाराष्ट्र, पंजाब, हरियाणासह देशातील विविध राज्यांमधून तसेच विदेशांतीलही स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धकांचे पालक तसेच त्यांचे प्रशिक्षक गेले दोन दिवस गोव्यात आहेत. शनिवारी काही कारणांमुळे स्पर्धा रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. रविवारी सकाळी स्पर्धेला सुऊवात झाली होती. स्थानिक मच्छीमारांना विश्वासात न घेता, त्यांना डावलून जबरदस्तीने स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामुळे केवळ पैशांसाठी आपल्या मुलांचा जीव आयोजकांनी धोक्यात घातला, असा आरोप जलतरण स्पर्धकांच्या पालकांनी केला आहे.
मच्छीमारांना डावलून स्पर्धेचा घाट
करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर ‘ओशनमॅन’ या स्पर्धेच्या आयोजनास स्थानिक मच्छीमारांनी विरोध केला होता. तरीही ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमुळे रापणीच्या दैनंदिन कामात अडथळे आणले, असा दावा मच्छीमारांनी केला. या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार रापण मारुन मासेमारी करीत असतात. तोच आपला पारंपरिक मुख्य व्यवसाय आहे. सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने मासळीचे उत्पादन घटले आहे. अशातच ही स्पर्धा घेतल्यास आपल्याला मच्छीमारी करताच येणार नाही, असे मच्छीमारांनी अगोदरच आयोजकांना बजावले होते. त्यानंतर आयोजकांनी शनिवारी ही स्पर्धा काही कारणाने पुढे ढकलण्यात येत असल्याचे सहभागी स्पर्धकांना सांगितले होते. रविवारी सकाळी स्पर्धा सुरु झाली तेव्हा काही जलतरणपटू मच्छीमारीच्या जाळ्यात अडकले. मात्र मोठी दुर्घटना होता होता टळली.
सरकारी अधिकाऱ्यांचे आयोजकाकडे साटेलोटे?
मिळालेल्या माहितीनुसार ‘ओशनमॅन’ जलतरण स्पर्धा मुंबईतील कपिल अरोरा याने आयोजित केली होती. कपिल अरोरा याच्याकडे स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात परवाने आहेत की नाही? याबाबत आम्हाला काहीच कल्पना नव्हती. परवाने आहेत काय, असे त्याला विचारल्यास होय, म्हणून सांगत होता, पण त्याने कोणतेच परवाने दाखवले नाही, असे पालकांनी सांगितले. अशाप्रकारे बाहेरचा कोणीही येतो, एवढी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतो, त्याबाबत गोवा सरकारच्या जबाबदार असलेल्या किमान पाचपैकी कोणत्याच संबंधित खात्याला माहिती मिळाली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर सराकारी अधिकाऱ्यांचे या कपिल अरोरा याच्याकडे साटेलोटे असावेत, असा संशय जलतरणपटूंचे पालक, प्रशिक्षक तसेच स्थानिक मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात आला.