Karad News : कराडजवळ उभ्या कंटेनरला स्विफ्टची जोरदार धडक; चार जखमी
पाचवड फाट्यावर पहाटे भीषण अपघात
कराड : पाचवड फाटा (ता. कराड) कोल्हापूर-सातारा मार्गावर भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. या अपघातात स्विफ्टमधील चार जण किरकोळ जखमी झाले.
जखमी प्रवासी हे पुण्याहून देवदर्शनासाठी आदमापूर येथे जाऊन परत पुण्याकडे निघाले असताना हा अपघात झाला. कंटेनर रस्त्यावर उभा असल्याने मागून आलेल्या कारला थांबण्यास वेळ न मिळाल्याने धडक बसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघाताची माहितीमिळताच डी. पी. जैन, पीआरओ ऑफिसर दस्तगीर आगा, बाबर पैलवान, सुनील कदम, महेश फल्ले तसेच नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले.
रुग्णवाहिका व अमृत बाबर यांच्या जखमींना खासर्गा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, या मार्गावर उभ्या वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने वाहतूक सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.