आवक वाढल्याने रताळ्याचे दर गडगडले
बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्यांची विक्रमी आवक झाल्याने दरात घसरण झाली आहे. शनिवार दि. 7 रोजी एकाच दिवशी तब्बल 100 ते 150 वाहनांची आवक झाली. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने प्रति क्विंटलला 800 ते 1200 रुपयांना रताळ्यांची विक्री करावी लागली. मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्यांची आवक झाल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितली. भात कापणी आणि मळणीची कामे जवळजवळ संपली आहेत. त्यातच फेंगल चक्री वादळामुळे दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रताळी खराब होऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी रताळी काढण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र एकाचवेळी शेतकऱ्यांनी रताळी काढणीला सुरुवात केल्याने आवक वाढली आहे. मागच्या आठवड्यात प्रति क्विंटलला 1500 रुपये इतका दर होता. मात्र आता मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने दरात घसरण झाली आहे.
दर घसरल्याचा फटका शेतकऱ्यांना
बेळगाव, खानापूर आणि चंदगड तालुक्यातून रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. रताळ्याचा भाव घसरल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शनिवारी एकाच दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 ते 150 गाड्यांची आवक झाली. सहसा 12 ते 1 पर्यंत गाड्या खाली होतात. मात्र शनिवारी गाड्यातील रताळी उतरण्यासाठी दुपारपर्यंत वेळ लागला.