पावसामुळे रताळी आवक थंडावली : कांदा-बटाटा दर स्थिर
सध्या कोथिंबीरचा दर घसरला : टोमॅटोच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ : मेथी, शेपू, लाल भाजी, पुदीना दरात घसरण
सुधीर गडकरी /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र कांदा, कर्नाटक कांदा, इंदोर बटाटा, आग्रा बटाटा यांचा भाव प्रति क्विंटलला स्थिर आहे. तसेच गुळाचा भावदेखील स्थिर आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील रताळी आवक मात्र विक्रीसाठी आली नाही. यामुळे खरेदीदारांना रताळ्याविनाच परतावे लागले. भाजीमार्केटमध्ये सध्या कोथिंबीरचा दर घसरला आहे. आणि टोमॅटोच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर मेथी, शेपु, लाल भाजी, पुदीना यांच्या दरात घसरण झाली आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. टोमॅटो प्रती ट्रेचा भाव सध्या 1200 ते 1400 रुपये आहे.
गेल्या आठवडाभरापासून बेळगाव तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. यामुळे कच्च्या भाजीपाल्यांना गोवा, कोकणपट्ट्यासह कारवार व बेळगाव परिसरामध्ये मागणी थंडावली आहे. पावसाच्या पाण्यामुळे भाजीपाला खराब होऊ लागला आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांसह मोठे खरेदीदार देखील मागणीनुसार भाजीपाला खरेदी करत आहेत. सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. गाजर इंदोरमधून येत आहे. अतीपावसामुळे टोमॅटोचे नुकसान झाले असून टोमॅटो ट्रेचा भाव मात्र थोड्या प्रमाणात वाढला आहे.
तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. यामुळे रताळी भरण्यासाठी योग्य हंगाम नसल्या कारणामुळे शेतकऱ्यांनी शनिवार दि. 20 रोजी रताळी भरली नाही. यामुळे मार्केट यार्डमध्ये रताळी आवकच विक्रीसाठी आली नाही. नेहमीप्रमाणे रताळी खरेदीसाठी आलेल्या खरेदीदारांना रताळ्यांविनाच परतावे लागले, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली. मागील शनिवार दि. 13 रोजी मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, गूळ, रताळ्याचा जो भाव झाला होता तोच भाव शनिवार दि. 20 रोजीच्या बाजारात झाला आहे. यामुळे बाजारभाव सध्या टिकून आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. यंदा बेळगाव तालुक्यामध्ये पावसाळी बटाटा लागवड जास्त प्रमाणात करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीनंतर हा बटाटा काढणीला प्रारंभ होतो. सध्या परराज्यातील इंदोर आणि आग्रा बटाट्यावर अवलंबून आहे.
शितगृहातील इंदोर-आग्रा बटाटा
इंदोरमध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इंदोर बटाटा काढणीला प्रारंभ होतो. त्यावेळी बटाटा कचवड असतो. फेब्रुवारीनंतर बटाटा पाकड येतो. त्यानंतर मार्च व एप्रिल महिन्यामध्ये तेथील स्थानिक तेजी-मंदी करणारे (स्टॉक मार्केट) व्यापारी बटाटा खरेदी करून विविध ठिकाणच्या शितगृहांमध्ये साठवून ठेवतात. आणि शेतकऱ्यांकडील व खेड्यांमध्ये साठवलेला बटाटा माल संपला की शितगृहातील बटाटा विक्रीसाठी काढला जातो. पुढील डिसेंबरपर्यंत शितगृहातील बटाटाच सर्वत्र विक्रीसाठी पाठवला जातो, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
कांदा आवकेत घट, मात्र भाव स्थिर
पावसामुळे महाराष्ट्रातून कांदा आवक थोड्या-थोड्या प्रमाणात येत आहे. तर शेतकरी वर्ग पंढरीची वारी करून नुकतेच परतले आहेत. यामुळे सर्वत्र कांदा आवकेत घट झाली आहे. तरीसुद्धा मुसळधार पावसामुळे गोवा व अन्य ठिकाणी मागणी कमी झाली आहे. यामुळे मागणीत देखील घट निर्माण झाली आहे. यामुळे कांदा भाव आवक कमी असून देखील स्थिर आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
कांदा मागणीत घट
सध्या सुरू असणाऱ्या धुवाधार पावसामुळे बेळगावसह इतर ठिकाणी कांद्याला मागणी कमी झाली आहे. कारण नागरिक कामे संपली की घराकडे वळत आहेत. यामुळे बेळगाव, गोवा, कारवारसह इतर ठिकाणातील हॉटेल, कॅन्टीन, मेस, खानावळ, भजी सेंटर व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला आहे. हॉटेलांसह अन्य व्यवहार कमी झाले आहेत. या वरील ठिकाणाहून कांदा, बटाट्याला मागणी देखील कमी झाली आहे. नागपंचमीला सर्व व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.