For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीलंकेचा शेवट गोड, नेदरलँड्सला पराभवासह निरोप

06:26 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीलंकेचा शेवट गोड   नेदरलँड्सला पराभवासह निरोप
Advertisement

अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंका 83 धावांनी विजयी :

Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट ल्युसिया, वेस्ट इंडिज

येथील डॅरेन सॅमी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा 83 धावांनी पराभव केला. दोन्ही संघांना साखळी फेरीत गाशा गुंडाळावा लागला असला तरी लंकेने टी 20 विश्वचषकाचा शेवट गोड केला तर नेदरलँड्सला पराभवासह निरोप घ्यावा लागला. श्रीलंकाने 202 धावांचे लक्ष्य नेदरलँडला दिले परंतु नेदरलँडचा संघ केवळ 118 धावाच करु शकला. 21 चेंडूत 46 धावा व दोन झेल घेणाऱ्या लंकेच्या चरिथ असलंकाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

नेदरलँडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पंरतु तो सपशेल अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लंकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पथुन निसंकाला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर कुशल मेंडिसने शानदार खेळी साकारताना 29 चेंडूत 46 धावा केल्या. चरिथ असलंकानेही 21 चेंडूत 1 चौकार व 5 षटकारासह 46 धावांचे योगदान दिले. याशिवाय, धनंजय डी सिल्वाने 34 तर अँजेलो मॅथ्यूजने 30 धावा केल्या. यामुळे लंकेने 20 षटकांत 8 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या विश्वचषकात 200 धावा करणारा श्रीलंका दुसरा संघ ठरला. याआधी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 201 धावा केल्या होत्या.

श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला नेदरलँडचा संघ 118 धावांवर गडगडला. मायकेल लेविट आणि मॅक्स ओडॉड संघासाठी सलामीला आले. लेविटने 2 चौकार आणि 3 षटकारांसह 31 धावा केल्या तर ओडॉड 11 धावा करून पव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 31 धावांचे योगदान दिले तर आर्यन दत्त 10 धावा करून बाद झाला. इतर फलंदाज मात्र लंकन गोलंदाजासमोर हतबल ठरले. लंकेकडून नुवान तुषाराने सर्वाधिक 24 धावांत 3 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका 20 षटकांत 6 बाद 201 (कुशल मेंडिस 46, धनंजय डी सिल्वा 34, चरिथ असालंका 46, मॅथ्यूज नाबाद 30, वानिंदू हसरंगा नाबाद 20, लोगान व्हॅन वीक 2 बळी, टीम प्रिंगल, व्हिव्हियन किंगमा, पॉल व्हॅन मीकरेन आणि आर्यन दत्त प्रत्येकी एक बळी).

नेदरलँड 16.4 षटकांत सर्वबाद 118 (लेविट 31, ओडॉड 11, स्कॉट एडवर्ड 31, तुषारा 3 बळी, हसरंगा व पथिराणा प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.