झारखंडमध्ये गुरुवारी शपथविधी सोहळा
हेमंत सोरेन यांचा सरकार स्थापनेचा दावा
वृत्तसंस्था/ रांची
झारखंड विधानसभा निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्यानंतर हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. झारखंडमध्ये पुन्हा ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. रविवारी ‘इंडिया’ आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यानुसार येत्या गुरुवारी शपथविधी आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे.
झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी हेमंत सोरेन यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. तत्पूर्वी, हेमंत सोरेन यांनी रविवारी दुपारी 4 वाजता रांची येथील राजभवनात राज्यपालांची भेट घेत राजीनामा सादर करून पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा केला. मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा हेमंत सोरेन यांच्याकडेच राहील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचबरोबर आता मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरल्याचे समजते. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा रांचीच्या मोरहाबादी मैदानावर होणार आहे.
हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्त्वाखालील आघाडीने निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पुनरागमनाचा मार्ग सुकर केला. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागला. तरीही, जेएमएम 81 सदस्यांच्या विधानसभेत 56 जागा मिळवण्यात यशस्वी झाला. येत्या गुरुवारी होणाऱ्या शपथविधी समारंभाला ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव, दीपंकर भट्टाचार्य उपस्थित राहू शकतात. याशिवाय इतर अनेक राष्ट्रीय नेतेही सहभागी होऊ शकतात.
झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. यामध्ये जनतेने पुन्हा एकदा सत्ताधारी आघाडीवर विश्वास व्यक्त केला. 81 पैकी 56 जागा ‘इंडिया’ ब्लॉकच्या खात्यात गेल्या तर 24 जागा भाजप आणि 1 जागा इतरांच्या खात्यात गेली. ‘इंडिया’ आघाडीतील जेएमएमने सर्वाधिक 34 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 16 जागा जिंकल्या, आरजेडीने 4 जागा जिंकतानाच सीपीआयने 2 जागा जिंकल्या.