हरियाणात शपथविधी येत्या मंगळवारी
वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणातील नव्या भारतीय जनता पक्ष सरकारचा शपथविधी येत्या मंगळवारी, अर्थात, 15 ऑक्टोबरला होणार आहे. या राज्यातील पंचकुला येथे तो होणार असून प्रशासनाने या कार्यक्रमासाठी सज्जता करण्यास प्रारंभ केला आहे. समारंभाची पूर्वतयारी करण्यासाठी 10 अधिकऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती पंचकुलाचे उपायुक्त यश गर्ग यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या आधी हरियाणातील भारतीय जनता पक्ष विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नायाबसिंग सैनी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली जाईल. नायाबसिंग सैनी यांच्या नेतृत्वातच या राज्यातली विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने जिंकली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी त्यांचीच निवड होणार असून त्यांच्यासह 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते.
पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार
शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या इतर राज्यांमधील मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरकारे असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
सर्वात मोठा विजय
नुकत्याच झालेल्या हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या आतापर्यंतचा या राज्यातील सर्वात मोठा विजय मिळविला आहे. या पक्षाने एकंदर 90 विधानसभा जागांपैकी 48 जागांवर विजय संपादन केला असून जवळपास 40 टक्के मते मिळविली आहेत. विजयाची अपेक्षा बाळगलेल्या काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून 37 जागा या पक्षाच्या पदरात पडल्या आहेत. जननायक जनता पक्ष या प्रादेशिक पक्षाचा तसेच आम आदमी पक्षाचा पूर्ण धुव्वा उडाला असून भारतीय राष्ट्रीय लोकदलाला 2 जागा आहेत. तीन अपक्ष उमेदवारी जिंकले असून त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा घोषित केला आहे.