स्वाती मालीवाल दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर कचरा फेकल्याने कारवाई
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी गुरुवारी अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर कचरा फेकला. तीन वाहनांमध्ये कचरा भरून निषेध करण्यासाठी त्या अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्या होत्या. याचदरम्यान पोलिसांनी स्वाती मालीवाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वाती मालीवाल स्थानिक रहिवाशांसह विकासपुरी परिसरात पोहोचल्या असता त्यांना कचऱ्याचे ढीग दिसून आले होते. याप्रकरणी आप प्रमुख केजरीवाल यांच्यावर त्यांनी टीका केली.
केजरीवाल आता सामान्य माणूस राहिलेले नाहीत... त्यांना दिल्लीच्या वास्तवाची काहीच कल्पना नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. ‘आम्ही हा कचरा अरविंद केजरीवाल यांच्या घरी घेऊन जाऊ आणि त्यांना विचारू की दिल्लीच्या प्रत्येक भागाला दिलेल्या या घाणेरड्या भेटीचे काय करायचे.’ असे त्या म्हणाल्या. दिल्लीतील स्वच्छता आणि पायाभूत सुविधांची स्थिती बिकट झाल्याचा दावा मालीवाल यांनी केला. त्यांनी विकासपुरीच्या महिलांच्या तक्रारींचा उल्लेख करत स्थानिक आमदारांकडे अनेक तक्रारी करूनही रस्त्यावर कचरा साचत असल्याचे सांगितले. दिल्लीचा प्रत्येक कोपरा घाणीने भरलेला आहे, रस्ते तुटलेले आहेत आणि गटारे तुडुंब भरून वाहत आहेत. केजरीवाल शहराच्या समस्यांपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, असेही त्या म्हणाल्या.