महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वप्नीलचा ‘स्वप्नवत’ नेम

06:12 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोल्हापूरच्या स्वप्निलने 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात जिंकले कांस्यपदक : ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

Advertisement

भारताचा स्टार नेमबाज स्वप्निल कुसाळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये त्याने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे,  खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्निल महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक असून ही तीनही पदके नेमबाजीत मिळवलेली आहेत. स्वप्नीलच्या या शानदार कामगिरीनंतर त्याच्या मूळगावी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीत एकच जल्लोष करण्यात आला. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.

नेमबाजीत मनू भाकर व सरबजोत सिंग यांच्यानंतर 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसाळेने पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली होती. गुरुवारी अंतिम लढतीत स्वप्निलने संथ सुरुवात केली. पहिल्या फेरीत (नीलिंग म्हणजेच मांडीवर बसून) (पहिली सीरीज- 50.8, दुसरी सीरीज- 50.9, तिसरी सीरीज- 51.6) 153.3 असा स्कोअर केला. या फेरीत तो सहाव्या स्थानी राहिला. यानंतर त्याने प्रोनमध्ये म्हणजेच पोटावर झोपून (पहिली सीरीज- 52.7, दुसरी सीरीज- 52.2, तिसरी सीरीज- 51.9) 156.8 गुण मिळवून आपली स्थिती सुधारली. प्रोनमध्ये तो पाचव्या स्थानी होता. यानंतर मात्र त्याने अविस्मरणीय अशी कामगिरी केली. शेवटच्या स्टॅडिंग सीरीजमध्ये त्याने 51.1 व 50.4 गुण मिळवत आपला स्कोअर 422.1 असा केला. एलिमिनेशन फेरीत शानदार कामगिरी करत त्याने 451. 4 गुणासह ऐतिहासिक असे कांस्यपदक जिंकले. या प्रकारात चीनच्या लियू युकुनने 463.6 गुण मिळवत सुवर्णपदकही जिंकले. युक्रेनच्या कुलिस सेरीने 461.3 गुणासह रौप्यपदक पटकावले.

कोल्हापूर अन् ऑलिम्पिक पदक योगायोग

हेलसिंकी येथे 1952 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. यानंतर तब्बल 72 वर्षांनंतर म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये स्वप्निल कुसाळेने कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे असून, ऑलिम्पिकमधील हा विशेष योगायोग ठरला आहे.

पदक जिंकल्यानंतर खूप आनंदी आहे. मला ज्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो. सामन्यात प्रेशरपेक्षा भारतासाठी काय तरी करायचं हेच मनात सुरू होत, यासाठीच तशीच मेहनत घेतली. या सामन्यात मला जे काही सर्वोत्तम देता येईल ते दिलं.

 स्वप्निल कुसाळे, पदकविजेता नेमबाज,

महाराष्ट्र सरकारकडून 1 कोटींचे बक्षीस जाहीर

मुंबई : शाब्बास स्वप्निल...तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्निल कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्निलला एक कोटींचे पारितोषिक देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑलिम्पिकवीर स्वप्निलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधला.

अद्वितीय कामगिरी...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत मराठमोळ्या स्वप्निलचे कौतुक केले आहे. स्वप्निल ऑलिम्पिकमध्ये तू अद्वितीय कामगिरी केली आहेस. तुझ्या कामगिरीने प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.

 नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ऑलिम्पिक इतिहासात नेमबाजीत भारताला सातवे पदक

ऑलिम्पिक इतिहासात भारताने प्रथमच एका पर्वात शूटिंगमध्ये तीन पदके मिळवली आहेत. आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत मिळालेले हे सातवे पदक आहे. याआधी राजवर्धनसिंह राठोड (रौप्य, 2004), अभिनव बिंद्रा (सुवर्ण, 2008), गगन नारंग (कांस्य, 2008), विजय कुमार (रौप्य, 2012), मनु भाकर (कांस्य, 2024), मनु भाकर-सरबजोत सिंह (कांस्य, 2024), स्वप्निल कुसाळे (2024, कांस्य) यांनी पदक मिळवले आहे.

महेंद्रसिंग धोनी आदर्श

ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठणाऱ्या  स्वप्नील भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले. एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला असून त्याच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली असल्याचेही त्याने सांगितले. योगायोग म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो.

मध्य रेल्वेचा स्वप्नीलवर कौतुकाचा वर्षाव, थेट पदोन्नती करणार

मध्य रेल्वेच्या पुणे परिमंडळात टीसी असणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या ऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीनंतर भारतीय रेल्वेने देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वप्नील 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. ऑलिम्पिकमधील स्वप्नीलचे यश ही मध्य रेल्वेसाठी अभिमानास्पद बाब आहे. स्वप्निल पॅरिसहून भारतात आल्यानंतर भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी केली. ही सर्व प्रक्रिया रेल्वेच्या धोरणानुसार होईल असेही त्यांनी सांगितले.

तब्बल 72 वर्षांनी खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेत राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी अनोखा उत्साह निर्माण केला आहे. कोल्हापूर जिह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वप्नीलची जिद्द व चिकाटी पाहता तो सुवर्णपदाचा मानकरी ठरणार अशी आम्हाला खात्री होती. तरीही त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावून देशासह कोल्हापूर जिल्हा, राधानगरी तालुक्यासह कांबळवाडी गावचा नावलौकीक वाढला आहे. त्याच्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

 वडील सुरेश कुसाळे, आई अनिता कुसाळे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article