For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या पक्षाची स्थापना करणार स्वामीप्रसाद मौर्य; सप नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न

06:38 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
नव्या पक्षाची स्थापना करणार स्वामीप्रसाद मौर्य  सप नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न
Advertisement

नाव अन् ध्वज केला सादर : 

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

समाजवादी पक्षात उपेक्षा होत असल्याचे म्हणत आमदार स्वामीप्रसाद मौर्य यांनी  राष्ट्रीय महासचिव पदाचा राजीनामा दिला होता. मौर्य आता नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. याकरता त्यांनी नव्या पक्षाचे नाव आणि ध्वज सादर केला आहे. 22 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये मौर्य हे सभेला संबोधित करणार आहेत. त्यांच्या नव्या पक्षाचे नाव राष्ट्रीय शोषित समाज पक्ष असणार आहे. या पक्षाच्या ध्वजात निळा, लाल आणि हिरवा रंग असणार आहे. तर याचदरम्यान सप नेते रामगोविंद चौधरी यांनी मौर्य यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Advertisement

समाजवादी पक्षात सामील झाल्यापासून पक्षाचा जनाधार वाढविण्याचा प्रयत्न केला. याचनुसार आदिवासी, दलित आणि मागासांना पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मागील काही काळापासून पक्षात माझी उपेक्षा होत असल्याचे म्हणत मौर्य यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

कुठल्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे कुणीच ओळखू शकत नाही. प्रत्येक जण येथे केवळ फायद्यासाठी पळ काढत असल्याची टिप्पणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मौर्य यांना उद्देशून केली आहे. यावर मौर्य यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. अखिलेश हे काही केंद्र तसेच राज्यात सत्तेवर नाहीत. ते काहीही देण्याच्या स्थितीत देखील नाहीत. आतापर्यंत त्यांनी मला जे काही दिले, ते मी सर्वकाही परत करणार आहे. माझ्यासाठी विचारसरणी अधिक महत्त्वाची आहे. पद नव्हे. सर्व समुदायांना अधिकार आणि त्यांचे कल्याण यालाच माझी प्राथमिकता असल्याचा दावा मौर्य यांनी केला.

अखिलेश यादव यांना मी 13 फेब्रुवारीला राजीनाम्याचे पत्र पाठविले होते, यानंतर अखिलेश यांनी संपर्क साधणेही महत्त्वाचे मानले नाही, यामुळे मी आता पुढील पाऊल टाकणार आहे. 22 फेब्रुवारीला दिल्लीत कार्यकर्ते जमणार आहेत. त्याचदिवशी निर्णय घेतला जाईल असे मौर्य यांनी म्हटले आहे. स्वामीप्रसाद हे काही नेत्यांसोबत मिळून नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे मानले जात आहे. पक्षात समाजवादी पक्षातील त्यांचे समर्थक, माजी आमदार, माजी खासदार आणि बिहारमधील अनेक नेत सामील होऊ शकतात.

Advertisement
Tags :

.