‘स्वच्छ भारत’ने वाचविले हजारोंचे प्राण
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये प्रतिवर्ष 60 हजार ते 70 हजार बालकांचे प्राण वाचविले आहेत, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. या अभियानाचा प्रारंभ झाल्यापासून भारताच्या बालकमृत्यू दरात मोठी घट दिसून आली आहे. या अभ्यासाचा अहवाल प्रख्यात आंतराष्ट्रीय विज्ञान नियतकालिक ‘नेचर’ मध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. आंतरराष्ट्रीय योग्यतेच्या पाच प्रसिद्ध निरीक्षकांनी भारतात गेल्या दोन वर्षांमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे रोगराई कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांना घर नाही आणि ज्यांना बाहेर उघड्यावर रहावे लागते, अशा असंख्य बालकांचे प्राण वाचले आहेत. प्रतिवर्ष ही संख्या किमान 60 हजार ते 70 हजार इतकी आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
2014 मध्ये प्रारंभ
2 ऑक्टोबर 2014 या दिवशी या अभियानाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्या अंतर्गत सार्वजनिक स्थानांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. लोकसहभागातून हे अभियान चालविण्यात येत असून त्याला लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याला जोडून घर तेथे शौचालय हे अभियान चालविण्यात आल्याने सार्वजनिक स्थानांमधील अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. त्यामुळे घाणीमुळे निर्माण होणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी झाले असून याचा लाभ बालकांना झाला आहे. हे अभियान हाती घेण्याच्या आधीच्या परिस्थितीशी तुलना केल्यास ही परिस्थिती लक्षात येते. या अभियानाच्या पूर्वी देशात बालकमृत्यूचे प्रमाण जास्त होते. तसेच बालकांच्या रोगराईने मृत्यू होण्याचे प्रमाणही गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत अधिक होते, असे सर्वेक्षण स्पष्ट करते.
पाणी आणि स्वच्छता
या अभियानामुळे पिण्याच्या पाण्याची शुद्धता वाढली आहे. तसेच स्वच्छतेसंबंधीची जागरुकताही सर्वसामान्य नागरीकांमध्ये वाढली आहे. याचा परिणाम म्हणून अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या रोगांना आणि व्याधींना बऱ्याच प्रमाणात आळा बसला आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.