हेर्लेत 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी 'जवाहर'ची ऊस वाहतूक रोखली!
हेर्ले (वार्ताहर) हेर्ले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कुंभोज हून ऊस घेऊन पोलीस बंदोबस्तात जवाहर साखर कारखान्यांकडे निघालेला उसाचा ट्रॅक्टर हेर्ले मध्ये रोखला.यावेळी कार्यकर्त्यांनी तब्बल पाऊण तास कोल्हापुर सांगली महामार्ग रोखून धरला.यामूळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी जवाहर साखर कारखान्यांचे व्हॉइस चेअरमन बाबासो चौगुले व संचालक आदगोंडा पाटील यांच्याशी कार्यकर्त्यांनी ऊस दराविषयी जोरदार शाब्दिक वादावादी झाली.
आज सायंकाळी साडे पाच वाजता कुंभोजहून जवाहर साखर कारखाना हुपरी कडे ऊस भरलेला ट्रॅक्टर पोलिस बंदोबस्तात चालला असता गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना याची माहिती लागताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावातील कोल्हापूर सांगली महामार्गावर दाखल झाले.गावामध्ये ऊस ट्रॅक्टर दाखल होताच संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर महामार्गावरच रोखून धरला ही माहिती जवाहर साखर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले व संचालक आदगोंडा पाटील यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले .
यावेळी संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गत हंगामातील 400रुपये व चालू गळीत हंगामासाठी 3500रुपये ऊस दर जवाहर साखर कारखान्यांने द्यावा अन्यथा उसाचा ट्रॅक्टर जागेवरून सोडणार नाही अशी भूमिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले व संचालक आदगोंडा पाटील यांच्याशी जोरदार शाब्दिक वाद घातला.यामुळे महामार्गावर गावात वाहतूक कोंडी झाली होती.
अखेर ऊस दराचा तोडगा निघल्याशीवाय ऊस वाहतूक करणार नाही,हा ऊस शेतात तोडुन चार दिवस झाले आहेत शेतकऱ्याचे नुकसान होवू देऊ नका नको असे जवाहर साखर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले व संचालक आदगोंडा पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजाऊन सांगितले. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा ऊस वाहतूक झाल्यास ट्रॅक्टर फोडण्याचा इशारा दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे बाळगोंडा पाटील ,राहुल चौगुले ,विद्यासागर चौगुले ,संकेत पाटील, शुभम पाटील ,सुरेश मगदूम, शरद पाटील, आदगोंडा नाना पाटील,शिवाजी कोळेकर यांचे सह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.