शेतकऱ्यांच्या प्रश्नाला किती ताणवायचं हे त्यांनी ठरवावं...मी कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही- महादेवराव महाडिक
शेतकऱ्यांनी दिलेली खर्डा भाकरी आपण स्विकारली असून काय़ योग्य आहे आणि काय नाही हे ठरवण्याचे अधिकार सरकारला आहे. तसेच मी सध्या आमदार नसल्याने कोणतेही आश्वासन देऊ शकत नसल्याचे रोखठोक मत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मांडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथून आपल्या कार्यकर्त्यांना साखर कारखानदारांच्या घरी जाऊन खर्डा भाकरी देण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घरी जाऊन त्यांना खर्डा भाकरी दिल्ली. यावेळी महाडिकांनी कार्यकर्त्यांसमोरच आपले मत मांडले.
राजू शेट्टी यांनी केलेल्या आवाहनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी घेऊन माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पुलाची शिरोली येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी महादेवराव महाडिक यांनी आपल्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्याचे स्वागत केलं.
यावेळी बोलताना महादेवराव महाडिक म्हणाले, "शेतकरी संघटनेने जे काही खर्डा भाकरी आंदोलन केले आहे ते महाडिकांनी आनंदाने स्विकारले आहे. काय योग्य आहे काय नाही हे सरकार ठरवेल. ते ठरवण्याचा अधिकार मला नाही. त्यासाठी आमचं सरकार भक्कम आणि सक्षम आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे आश्वासन देऊ शकत नाही. मला तो अधिकारही नाही. मला तो अधिकार असता तर मी 100 टक्के दिला असता." असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना माजी आमदार महाडिक यांनी, "यापुर्वीही शेतकरी संघटनेची कोंडी महाडिकांनी सोडवली आहे....काही चांगल्या गोष्टी आहेत तसेच वाईटही आहेत. ज्याला जे पटेल त्यांनी ते करावं शेवटी हा सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला किती ताणवायचं हे नेत्यांनी ठरवावं." असाही सल्ला त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्य़ा प्रश्नावर राज्यसरकारला काय आवाहन कराल असे विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, "मी शासनाला काही सांगू शकत नाही. अठरा वर्षे आमदार होतो त्यावेळी सांगितले आहे. नेत्यांना आणि शासनाला मी योग्य ते मार्गदर्शन त्यावेळी केलेलं आहे. आता त्याच मार्गदर्शनावर चालवावं." असेही ते म्हणाले.