ऊसदर जाहीर होईपर्यंत मोहनराव शिंदे कारखाना बंद ठेवण्याची हमी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काट्यावर ठिय्या आंदोलन
कारखाना सुरू असल्याने परिसरात ऊस वाहतुकीची वर्दळ होती. याचदरम्यान कार्यकर्त्यांनी ऊस वजनाच्या काट्याजवळ ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. ऊसदराचा निर्णय जाहीर होईपर्यंत गाळप सुरू ठेवू नये, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली.
या आंदोलनादरम्यान कारखाना प्रशासन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुमारे चार तास चर्चा झाली. ऊसदर जाहीर होईपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची हमी प्रशासनाने दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तोडलेला ऊस शनिवारी सायंकाळपर्यंत कारखान्यावर आणून त्यानंतर कारखाना बंद ठेवण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलंखुबे, तालुकाध्यक्ष सुरेश वसंगडे आणि नेते संदीप राजोबा यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ऊसदराच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मिरज पूर्व भागातील एरंडोली, खंडेराजुरी, बेडग, मालगाव, भोसे आणि आरग येथील कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
यावेळी संदीप राजोबा, संजू बेले, संजय खोलंखुबे, सुरेश वसंगडे, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, बाळासो पाटील, बाळासो लिंबेकाई यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
