आणि चेअरमन साहेबांना राग येतो तेंव्हा...!
साहेब मी इथलाच स्थानिक शेतकरी... आमची ऊसतोड तारीख आठ दिवसांपूर्वीची आहे, ऊसाचे क्षेत्र तसे कमी असल्यामुळे लांबणीवर गेलेला ऊस वाळण्याची शक्यता आहे , आमच्या ऊसाला तोड मिळेल का? शेतकऱ्याच्या या प्रश्नावर कारखान्याचे चेअरमन चांगलेच भडकले. स्थानिक म्हंटल्यावर साहेबांचा पाराच चढला.
तुमच्या गावकऱ्यांमुळं कारखान्याचा गळीत हंगाम एक महिना पुढं गेला. ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे उसाची तोड वेळेत होत नाही. त्यात तुमच्या गावकऱ्यांनी कारखान्याच्या एम.डी.लाच मारहाण केली आणि आता आलाय होय तोड मागायला !...हे संभाषण आहे सात तालुक्यातील 122 गावांचे कार्यक्षेत्र व 12 हजार सभासद असलेल्या एका जुन्या साखर कारखान्यातील नव्या चेअरमन व ऊस उत्पादक शेतकऱ्याचे.
यंदा अवकाळी पाऊस व ऊस दरवाढ आंदोलनामुळे लांबणीवर पडलेल्या गळीत हंगामामुळे सर्वच कारखान्यांची ऊसतोडीसाठी कसरत सुरू आहे. तसेच ऊसतोड कार्यक्रम जवळजवळ एक महिना पुढे गेला असून ऊस तोडीस विलंब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी कारखाना कार्यालयात जाऊन ऊसतोडीसंदर्भात कारखाना अधिकारी तसेच वेळ पडली तर चेअरमन यांचीही भेट घेऊन ऊस नेण्याबाबत विनंती करत आहेत.
दरम्यान गळीत हंगामाच्या सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरवाढीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे कामाविना एक महिना बसून राहिलेल्या ऊसतोड मजुरांपैकी काही मजूर परत गावी गेले. ते परत कारखाना स्थळावर आलेच नाहीत. त्यामुळे कारखान्यांसमोर ऊसतोड मजुरांची कमतरता हा एक नवीन प्रश्न उभा राहिला. परिणामी महिनाभर लांबलेला गळीत हंगाम आणि ऊसतोड मजुरांची कमतरता यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नुकत्याच झालेल्या अस्तित्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत महापालिकेच्या हद्दीतील एका कारखान्यातील नूतन चेअरमन ऊसतोड संदर्भात भेटायला गेलेल्या शेतकऱ्यावर चांगलेच तापले. ते म्हणाले, तुमच्या गाववाल्यांनी कारखान्याच्या एमडीला मारहाण केली आणि आता ऊसतोड मागायला येता..! प्रत्यक्षात एमडीना झालेल्या मारहाणीत त्या संबंधित शेतकऱ्याचा कोणताही सहभाग नव्हता, पण तो शेतकरी उपनगरातील असल्यामुळे चेअरमन त्याच्यावर चांगलेच भडकले. शीतावरून भाताची परीक्षा घेणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्या शेतकऱ्याला पडला अन् चेअरमनसाहेबांचे धन्यवाद मानून तो शेतकरी तिथून नम्रपणे बाहेर पडला.