स्वाभिमानीने पुणे-बेंगलूरू राष्ट्रीय महामार्ग रोखला
गत हंगामातील दुसऱ्या हप्त्यासाठी पंचगंगा पुलाजवळ चक्काजाम: शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महामार्गावरून उठणार नाही: माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका: सरकार, विरोधी पक्ष, साखर कारखानदार यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी
गत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता किमान शंभर रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. पंचगंगा नदी पूल परिसरातील हजरत पीर बालेसाहेब बाबा दर्ग्याजवळ चक्काजाम आंदोलन केले. दुसऱ्या हप्तबाबत साखर कारखानदार जोपर्यंत सकारात्मक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून न उठण्याची आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी घेतली. याप्रसंगी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकार सह विरोधी पक्ष आणि साखर कारखानदार यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
स्वाभिमानीसह जिल्ह्यातील अन्य शेतकरी संघटनांनी गत हंगामातील उसाला दुसरा हप्ता 400 रुपये आणि यंदाच्या हंगामातील पहिली उचल 3500 रुपये मिळाला पाहिजे या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून लढा उभा केला आहे. मागणी संदर्भात पालकमंत्री अश्विन मिश्री यांच्या अध्यक्षतेखाली एक आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठक झाली. तर यानंतर बुधवारी सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीतही यासंदर्भात बैठक झाली. सहकार मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन पावली मागे दुसरा हप्ता किमान शंभर रुपये मिळावा अशी मागणी केली. मात्र ही मागणी ही सरकार साखर कारखानदारांनी अमान्य केल्याने गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी दहा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदी पूल परिसरात रस्त्यावर उतरत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.
यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदारांचा धिक्कार असो, साखर कारखानदारांना पाठीशी घालत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा अधिकार असो अशी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, दुसरा हप्ता 400 रुपये मिळण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. यामध्ये तडजोड करत दुसरा हप्ता 100 रुपये मिळावा अशी आमची मागणी आहे. पण सरकारसह साखर कारखानदारांनी ही मागणी ही अमान्य केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या त्याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत महामार्ग रोखून धरणार आहे. शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय आता शेतकरी मागे हटणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.यावेळी सावकार मादनाईक, जालंदर पाटील, राजेंद्र गडनवार, विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील, अजित पोवार, महेश खराडे आदींसह स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकार कारखानदारांच्या पाठीशी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे सरकार शेतकरी हिताचे आहे. मात्र उसाच्या दुसऱ्या हप्त्याबाबत सरकारची भूमिका बघितली तर ती कारखानदारांना पाठीशी घालणारी आहे. त्यामुळे सरकार व साखर कारखानदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
विरोधी पक्षही बोलायला तयार नाही
इतर वेळी बारीक-सारीक मुद्द्यांवरून सरकार विरोधात लगेचच प्रसार माध्यमांसमोर व्यक्त होणारे विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या ऊस दराबाबत बोलायला तयार नाहीत. यावरून त्यांनाही शेतकऱ्यांची काही देणंघेणं नाही असे दिसून येते. न्याय हक्कासाठी आता शेतकऱ्यांनाच रस्त्यावर उतरावे लागणार आहे. उस तर बाबत विरोधी पक्षातील नेतेही सरकार व साखर कारखानदार यांना शामील असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
23 दिवसात एक लाख टन ऊस गाळप
जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे गाळप बंद आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांची मिळून दिवसाकाठी एक लाख टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीबाबत हंगाम सुरू होऊन 23 दिवस झाले तरी साखर कारखानदारांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी साखर कारखाने ही सुरू करू दिलेले नाहीत गेल्या 23 दिवसात जिल्ह्यात केवळ एक लाख तीस हजार टन ऊस गाळप झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
दडपशाही केली तरी शेतकरीच लढा जिंकणार
शेतकऱ्यांना लबाडणाऱ्या साखर कारखानदारांना सरकारकडून पोलीस संरक्षण पुरविले जात आहे. तर दरोडा पडलेल्या शेतकऱ्यांवर दडपशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. गावागावातून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहेत. सरकारने पोलीस प्रशासनाने कितीही दडपशाही केली तरी न्याय हक्कासाठी सुरू असलेला हा लढा शेतकरीच जिंकतील असा विश्वास शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.
महामार्गावरच शेतकऱ्यांची पंगत
महामार्ग रोखून धरण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासूनच शेतकरी पुणे बेंगलोर महामार्गावर आले होते. दुसऱ्या हप्त्याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून न उठण्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली. दुपारपर्यंत प्रशासन साखर कारखानदार कोणताही सकारात्मक प्रस्ताव न आल्याने शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यानंतर राष्ट्रीय महामार्गावरच सुमारे चार ते पाच हजार शेतकऱ्यांची जेवणाची पंगत बसली.
महामार्गाला पोलीस छावणीचे स्वरूप
चक्काजाम आंदोलनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बुधवारी रात्रीपासूनच तावडे हॉटेल पासून शिरोली पर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त येण्यात करण्यात आला होता. तसेच वाहतूक कोंडी काही ठिकाणी वाहतूक मार्गात बदल देखील करण्यात आले होते. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने गुरुवारी महामार्गाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कारखानदारांना गुडघे टेकवायला लावणार
शेतकऱ्यांच्या उसाचा दर कोणीतरी दोघे चौघेजण ठरवणार, हे चालणार नाही. दत्त हंगामात साखरेलाही चांगला दर मिळाला आहे तर उपपदार्थांमधूनही कारखानदारांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यास साखर कारखानदार तयार नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुसरा हप्ता घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत साखर कारखानदारांना गुडघे टेकवायला लावणार असा इशारा शेट्टी यांनी दिला.