सुझलॉनचे समभाग 13 टक्क्यांनी वाढले
तिमाहीत कंपनीचा नफा 5 पटीने वाढल्याचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
30 मे रोजीच्या ट्रेडिंगदरम्यान अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीच्या समभागांमध्ये 13 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आणि तो 74 रुपयांच्या वर गेला. जून 2023 नंतरची समभागाची ही सर्वात मोठी इंट्राडे वाढ आहे. सदरची वाढ ही कंपनीसाठी एकंदर उत्तम मानली जात आहे. शेअरबाजारात तथापि, नंतर समभागात थोडीशी घट झाली आणि दुपारी 12:40 वाजता सुमारे 9टक्क्यांनी वधारुन समभाग 71 रुपयांवर व्यवहार करत होता. पवनचक्की कंपनीच्या समभागांमध्ये झालेली वाढ गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या मजबूत निकालांमुळे आहे.
समभागाची कामगिरी
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स गेल्या 5 दिवसांत सुमारे 10 टक्के, एका महिन्यात 26टक्के, सहा महिन्यांत 8टक्के आणि एका वर्षात 56टक्के वाढले आहेत. या वर्षी म्हणजेच 1 जानेवारीपासून कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सुमारे 9 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 96,740 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एकंदर उर्जा क्षेत्रातील हा समभाग नवी उंची गाठतोय.