सुझलॉन समूहाला मिळाले 300 मेगावॅटचे कंत्राट
अप्रवा एनर्जीसोबत करण्यात आला पवन ऊर्जा करार : कंपनीचे समभाग वधारले
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सुझलॉन समूहाला 300 मेगावॅटचा पवन ऊर्जा उत्पादनाचे कंत्राट प्राप्त झाले आहे. या करारानंतर कंपनीचे समभाग तेजीत राहिले आहेत. नवीकरणीय ऊर्जा संबंधीत सुझलॉन समूहाला अप्रवा एनर्जीकडून 300 मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे अशी माहिती यावेळी कंपनीने दिली. कंपनीने सादर केलेल्या निवेदनानुसार, सुझलॉन कर्नाटकातील ग्राहकांच्या साइटवर हायब्रिड लॅटिस ट्युब्युलर टॉवर आणि 100 विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करणार आहे. सुझलॉन समूहाला अप्रवा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडसाठी 300 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
अप्रवा सोबत या अगोदरही काम
सुझलॉन समुहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी एका निवेदनात सांगितले की, कंपनीने अप्रवासोबत यापूर्वीही काम केले आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडल्याचा आनंद आहे. अप्रवा एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा म्हणाले,‘आम्ही सुझलॉनसोबत भागीदारी करत आहोत याचा आनंद आहे. त्यांच्या कौशल्याचा, समृद्ध अनुभवाचा आणि सर्वोत्कृष्ट स्वदेशी उपायांचा फायदा होईल.’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कंत्राटानंतर सुझलॉन एनर्जीचे समभाग वधारले. दुपारी 12:50 वाजता सुझलॉन एनर्जीचे शेअर्स 3.37 टक्क्यांनी किंवा 1.25 रुपयांनी 38.30 रुपयांवर व्यवहार करत होते.