For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चाकरमान्यांसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी 'सुविधा केंद्र'

11:38 AM Aug 26, 2025 IST | Radhika Patil
चाकरमान्यांसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी  सुविधा केंद्र
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता महामार्गावरून प्रवास सुरळीत व्हावा यासाठी आता जिल्हा प्रशासनाने जबाबदारी उचलली आहे. गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर १६ सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. या सुविधा केंद्रावर पोलीस, महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित असणार आहेत. प्रवासात कोणतीही अडचण आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या जवळच्या सुविधा केंद्राची मदत घ्यावी असे आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सवादरम्यान मुंबई, पुणेहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाचा सण हा आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण साजरा केला जातो. या दरम्यान चाकरमानी कोकण रेल्वे तसेच एस.टी. बसचे आगाऊ आरक्षणही करतात. रेल्वेने अनेक गाड्या या मार्गावर सुरू केल्या आहेत. या सर्व गाड्या फुल्ल झाल्या आहेत. सोबतच स्वतःचे वाहन घेवून कोकणात येणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. प्रत्येकाला वेळेत घरी पोहोचण्याची उत्सुकता असते. मात्र महामार्गावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे त्यांच्या मार्गात अडचणी येत आहेत. अशावेळी महामार्गावर वाहतुकीची कोंडी होणे, प्रवाशांची गैरसोय होणे तसेच अपघात होण्यासारख्या घटना घडू नयेत, प्रवाशांना तातडीची मदत मिळावी यासाठी ही जिल्हा प्रशासनाकडून सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत.

Advertisement

खेडपासून राजापूरपर्यंत ही केंद्र उभारण्यात आली आहेत. महामार्गावर कोणतीही वाहतूक कोंडी होवू नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी या सुविधा केंद्रात तैनात असणार आहेत. वाहतूक कोंडी जास्त काळ राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान वाहन नादुरूस्त झाल्यास तात्काळ मॅकॅनिकशी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत गाडी बाहेर काढणे अथवा बाजूला करण्यासाठी टोईंग व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोंडी टाळण्यासाठी उपलब्ध पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणे तसेच प्रवासादरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचाऱ्याही मदत करणार आहे.

प्रत्येक तालूक्यातून जाणाऱ्या महामार्ग अथवा पर्यायी मार्गाविषयी महसूल अधिकारी, तलाठी अथवा संबंधित मंडळ अधिकारी यांना उत्तम माहिती असते. तसेच परिसरातील काही संवेदनशील स्थळे, आवश्यकता भासल्यास निवारा केंद्र सुविधा, आरोग्य यंत्रणेशी संपर्क अशा कारणांसाठी महसूल विभागातील कर्मचारीही या सुविधा केंद्रावर काम पाहणार आहेत.

  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन

प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी महामार्गावर १६ सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. या सुविधा केंद्रात प्रवाशांसाठी एक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. प्रवासादरम्यान वाहन बिघाड झाल्यास मॅकॅनिक, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

                                                                                                 - नितीन बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

  • गणेशोत्सव काळात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध

गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांमुळे कोणतीही वाहतूक कोंडी होवू नये यासाठी बंदी राहणार आहे. भाजी, दूध आणि औषधे यांच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. एलपीजी गॅस वाहतुकीसाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

                                                                                  - राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

  • जिल्हा प्रशासन सज्ज

महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. कोंडी होणार नाही याची खबरदारी या सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास पर्यायी मार्ग, निवारा स्थान अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण आल्यास प्रवाशांनी जवळच्या सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.                                                                                                                - एम देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

  • महामार्गावरील १६ सुविधा केंद्रे
तालुकाठिकाणे
खेडगुणदे फाटा
भरणे नाका
सवतसडा पेढे
कळंबस्ते फाटा
चिपळूणबहादूरशेख नाका
अलोरे घाटमाथा (अलोरे)
दहिवली फाटा (सावर्डे)
संगमेश्वरतुरळ
संगमेश्वर बसस्थानक
देवगडमुर्शी
रत्नागिरीहातखंबा तिठा
पाली
लांजावेरळ
कुवे गणपती मंदिर
राजापूरजकात नाका

Advertisement
Tags :

.