केपीएस मॅग्नेटला विरोध दर्शवून 15 रोजी ‘सुवर्णसौध चलो’
शिंदोळीत एआयडीएसओच्या नेतृत्वात पालक-ग्रामस्थांचे आंदोलन
बेळगाव : कर्नाटक सरकारने केपीएस मॅग्नेट योजनेंतर्गत गावातील सरकारी शाळा बंद करण्याचा घाट रचला असल्याचा आरोप करीत शिंदोळी (ता. बेळगाव) येथे पालक व ग्रामस्थांनी गुऊवारी आंदोलन केले. ऑल इंडिया डेमॉक्रॉटिक स्टुडंट्स ऑर्गनायजेशन (एआयएसडीओ)ने आंदोलनाचे नेतृत्व केले होते. शिंदोळीतील मराठी, कन्नड, ऊर्दू या तीन शाळा, इंडालनगरातील कन्नड शाळा, बसरीकट्टी येथील मराठी, कन्नड शाळा, शगनमट्टी येथील उच्च प्राथमिक शाळा, तारिहाळ येथील मराठी, कन्नड शाळा अशा एकूण 9 शाळा बंद करून मास्तमर्डी येथील कन्नड उच्च प्राथमिक शाळेत विलीन करण्यात येणार आहेत. या सर्व गावातील शाळांसमोर आंदोलन करीत असलेले पालक व ग्रामस्थांनी एआयएसडीओच्या आवाहनानुसार 15 रोजी ‘सुवर्णसौध चलो’मध्ये सहभागी होण्याची तयारी चालविली आहे.
शिंदोळी येथे आंदोलनकर्त्यांना उद्देशून एआयडीएसओचे जिल्हा संचालक महांतेश बिळ्ळूर म्हणाले, एकही सरकारी शाळा बंद केली जाणार नाही, असे सांगणाऱ्या सरकारने बेळगावातील 2283 शाळा बंद करण्यासाठी यादी तयार केली आहेत. राज्यभरातून सुमारे 40 हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच बंद केलेल्या शाळांच्या इमारती खासगी स़ंघ संस्थांना वापरण्यासाठी देण्यासंबंधी मसुदा तयार करून बेळगावातील हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला आहे. राज्यभरातून 40 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या सरकारी शाळा बंद करण्यासाठी निघालेले सरकार गरीब जनतेच्या विरोधात आहे. सरकारी शाळा बंद करून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून कायमचे वंचित ठेवण्याचा सरकारचा कुटिल प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही. यावेळी एआयडीएसओचे संघटक गंगाधर यांसह ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर, शाळा सुधारणा व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष माळींगराय शहापूरकर, बाबागैडा पाटील, सविता पाटील आदी उपस्थित होते.